अरबी समुद्रातील ३ नौकांतून अमली पदार्थांसह मोठा शस्त्रसाठा कह्यात; ३ नौकांसह १९ मासेमारांना अटक

तटरक्षक दलाची मोठी कारवाई, घातपाताची शक्यता

मुंबई – तटरक्षक दलाने अरबी समुद्रातील ३ संशयित नौकांवर केलेल्या कारवाईत ४ सहस्र ९०० कोटी रुपयांचा १ सहस्र ६०० किलो अमली पदार्थांचा साठा, तसेच एके ४७ च्या ५ रायफली आणि १ सहस्र जिवंत काडतुसे कह्यात घेतली. लक्षद्वीपजवळील मिनिकॉय येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३ नौका कह्यात घेण्यात आल्या असून १९ मासेमारांना अटक करण्यात आली. यामध्ये मोठ्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असून याविषयीचे अन्वेषण चालू आहे.

तटरक्षक दलाची नौका गस्त घालत असतांना या नौकेवर काही मासेमार संशयास्पद वावरतांना आढळले. टेहळणी विमानाने आकाशात घिरट्या घालून या नौकेविषयी माहिती घेऊन मासेमारी करणार्‍या या तीनही नौकांना घेराव घातला. त्यापैकी ‘रवीहंसी’ या  श्रीलंकेच्या नौकेत हा शस्त्रसाठा आणि अमली पदार्थ होते. बाजूच्या अन्य २ नौका तिला संरक्षण पुरवत होत्या.