‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ भावसोहळ्याच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘११.१२.२०१९ या दिवशी ‘श्रीविष्णुतत्त्व जागृती’ भावसोहळा होता. प्रारंभी तो कोणता सोहळा आहे, हे आधी ठाऊक नव्हते. त्या दिवशी आणि त्या कालावधीत आलेल्या अनुभूती अन् जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. ‘भावसोहळ्याच्या दिवशी विष्णुतत्त्वाची रांगोळी काढावी’, अशी सूचना मिळाल्यावर रांगोळीचे छायाचित्रही मिळणे आणि छायाचित्र पाहिल्यावर लहानपणापासून काढत असलेली रांगोळी विष्णुतत्त्वाची आहे, हे ठाऊक नसणे अन् त्या वेळी देवानेच विष्णुतत्त्वाशी जोडून ठेवले असल्याचे लक्षात येऊन भावजागृती होणे

सौ. राजश्री खोल्लम

सोहळ्याची सिद्धता करण्याविषयीच्या सूचना मिळत होत्या. त्यात ‘भावसोहळ्याच्या दिवशी विष्णुतत्त्वाची रांगोळी काढावी’, अशी सूचना आणि रांगोळीचे छायाचित्रही होते. ती रांगोळी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की, ही माझी सर्वांत आवडती रांगोळी आहे. अगदी लहानपणापासून मी हीच रांगोळी दारापुढे काढत असे. आताही कधी कधी काढते; पण ‘ही विष्णुतत्त्वाची रांगोळी आहे’, हे मला ठाऊक नव्हते. त्या रांगोळीकडे पाहिल्यावर शांतीची अनुभूती येते. ‘अशा प्रकारे देवानेच मला विष्णुतत्त्वाशी जोडून ठेवले आहे’, हे लक्षात येऊन माझी भावजागृती झाली.

२. काही मासांपासून भावप्रयोग करतांना रात्री क्षीरसागरात शेषावर पहुडलेल्या विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणांशी बालिकेच्या रूपात झोपणे आणि असे दृश्य वारंवार दिसणे

पूर्वी रात्री झोपतांना ‘मी लहान बालिका असून परात्पर गुरुदेवांच्या पलंगावर त्यांच्या चरणांना घट्ट पकडून तिथे निद्रा घेत आहे’, असा भाव ठेवत असे. काही मासांपासून भावप्रयोग करतांना रात्री क्षीरसागरात शेषावर पहुडलेल्या विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणांशी क्षीरसागरावरच बालिकेच्या रूपात मी झोपले आहे आणि ‘विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणांशी श्रीमहालक्ष्मीस्वरूप सद्गुरुद्बयी बसल्या आहेत’, असे दृश्य वारंवार दिसते. त्या वेळी अथांग क्षीरसागर आणि त्याच्या लाटा दिसतात. त्या लाटांवर चंदेरी रेषांप्रमाणे प्रकाश दिसतो. तसेच सूक्ष्मातून त्या लाटांचा आवाजही ऐकू येतो. तसेच गारवाही जाणवतो.

३. भावसत्संगात सांगितल्याप्रमाणे स्वतः वैकुंठात परात्पर गुरुदेवांच्या चरणांवर एकेक तुळशीपत्र अर्पण करत असल्याचे दिसणे आणि तेव्हा भावावस्था अनुभवणे

एकदा भावसत्संगात सांगितले होते की, आपल्या सर्वांची निर्मिती वैकुंठातच झाली आहे आणि ‘आपण कोणतेही काम अथवा सेवा करत असू, त्या वेळी आपण वैकुंठातच आहोत’, असा भाव ठेवूया. त्यानुसार प्रयत्न करतांना ‘वैकुंठामध्ये सुदर्शनचक्र धारण केलेले परात्पर गुरुदेव सिंहासनावर बसलेले आहेत आणि स्वतः त्यांच्या चरणांशी बसून त्यांच्या चरणांवर एकेक तुळशीपत्र अर्पण करत आहे’, असे दिसते. तेव्हा मी भावावस्थेत असते. घरातील कामे आणि सेवा करतांना ‘वैकुंठातून एक शक्ती आणि चैतन्य यांचा स्रोत माझ्या शरिरात प्रवाहित झालेला आहे आणि त्या बळावरच सर्व कृती होत आहेत’, असे मी अनुभवते. त्या वेळी ‘देव आपल्यासाठी किती करतो’, याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते.

४. भावसोहळा पहातांना अखंड भावजागृती होत होती. ‘परात्पर गुरुदेव आपल्याला दर्शन देण्यासाठी एवढे घंटे एका स्थितीत बसून राहिले, किती ही त्यांची प्रीती’, असे सतत वाटून भावाश्रू येत होते.

५. वादनाच्या वेळी भावजागृती होणे आणि गायन ऐकतांना श्री महाविष्णूसमोर बसले असून काळही थांबला असल्याचे जाणवणे

बासरीवर ‘नारायणा रमारमणा . . .’ या गीताची धून ऐकतांना माझा भाव जागृत होत होता. कु. तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी या गायनसेवा सादर करत असतांना ‘मी साक्षात् वैकुंठातच श्रीमहाविष्णूसमोर बसले आहे आणि काळही थांबला आहे’, असे मला जाणवले.

६. कु. शर्वरी हिचे नृत्य पहातांना तिची भक्ती उच्च स्तराची असल्याचे जाणवणे

कु. शर्वरी कानस्कर हिचे नृत्य पहातांना ती साक्षात् श्रीमहाविष्णूसमोर नृत्य करत असून ती स्वतःला पूर्णपणे विसरून नृत्य करत असल्याचे जाणवले. तिची भावावस्था आणि भक्ती अतिशय उच्च स्तराची असल्याचे जाणवले.

७. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोन नसून एकच असल्याचे जाणवले.

८. सूत्रसंचालकांचा त्यांच्या सेवेप्रतीचा कृतज्ञताभाव त्यांच्या शब्दांतून व्यक्त होणे

श्री. विनायक शानभाग यांचे सूत्रसंचालन हे अल्प शब्दांत मोठा आशय सांगणारे, दर्शकांच्या मनात भक्तीभाव निर्माण करणारे आणि अंतर्मनाला स्पर्श करणारे असल्याचे जाणवले. साक्षात् श्रीमहाविष्णुसमोर उभे राहून अत्यंत भक्तीयुक्त अंतःकरणाने ते त्यांची स्तुती करत असल्याचे जाणवले. या सेवेप्रतीचा त्यांच्या मनातील कृतज्ञताभावही त्यांच्या शब्दांतून व्यक्त होत होता.

९. सोहळ्याच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी साधकजिवांना ‘ते साक्षात् श्रीमहाविष्णुच आहेत’, याची प्रचीती देणे आणि साधकांच्या मनात उत्कट भक्तीभावाचे बीज रोवणे

‘आतापर्यंत परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे महाविष्णूचे अवतार’, असे वाटत असे; पण या सोहळ्याद्वारे परात्पर गुरुदेवांनी सर्व साधक-जिवांना ‘ते साक्षात् श्रीमहाविष्णुच आहेत’, याची प्रचीती दिली. या सोहळ्याद्वारे प्रत्येकाच्या मनात उत्कट भक्तीभावाचे बीज त्यांनी रोवले. ‘साधकांना काय आणि केव्हा द्यायचे ?’, याचे ज्ञान केवळ महर्षि आणि परात्पर गुरुदेवांनाच आहे. त्यांची अखंड प्रीती आणि कृपा यांमुळे ते साधकांना साधनेचे पुढचे पुढचे टप्पे शिकवून भरभरून कृपावर्षावच करत आहेत.

महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या अपार कृपेसाठी त्यांच्या दिव्य अन् पवित्र चरणी कोटीश़ः कृतज्ञता !’

– सौ. राजश्री खोल्लम, पुणे

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक