|
मुंबई – पोलिसांच्या स्थानांतरामध्ये (बदलीमध्ये) कार्यरत असलेल्या मोठ्या रॅकेटविषयीचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊनही त्यांनी सरकार पडेल म्हणून याकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात भारतीय सेवेतील काही पोलीस अधिकारी आणि राजकीय नेते यांचा सहभाग आहे. यामध्ये गृहमंत्री आणि सरकार यांचा संबंध दिसत असल्याचेही या वेळी फडणवीस यांनी म्हटले. या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,
१. तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी २५ ऑगस्ट २०२० ला या प्रकरणाचा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक जयस्वाल यांच्याकडे दिला होता. जयस्वाल यांनी २६ ऑगस्ट २०२० या दिवशी हा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला.
२. तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक सीताराम कुंटे यांनी याविषयी पूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना दिली होती; मात्र यावर अद्याप कारवाई झालेली नाही. हा सर्व प्रकार गृहविभागासाठी लाजिरवाणा आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असूनही आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी कारवाई का केली नाही ? यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते आणि अशासकीय लोकही आहेत; मात्र हे प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्यांची नावे मी सांगणार नाही. याविषयी चौकशी व्हायला हवी.
३. उद्धव ठाकरे यांनी हा अहवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठवला होता; मात्र यावर कारवाई करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांच्यावरच कारवाई करण्यात आली.
४. रश्मी शुक्ला वरिष्ठ असूनही त्यांची बढती रोखण्यात आली. कनिष्ठ अधिकार्यांना ‘अॅडव्हान्स प्रमोशन’ देण्यात आले. कामगिरी चांगली असल्यामुळे रश्मी शुक्ला यांना अपरिहार्यतेने बढती देत त्यांच्यासाठी दुसरे पद निर्माण करण्यात आले.
५. रश्मी शुक्ला यांची बढती रोखून ‘त्यांनी अहवाल देऊन चूक केली’, असा संदेश दिला गेला. ज्यांची नावे या अहवालात आहेत, त्याच अधिकार्यांना त्या पदांचा कार्यभार देण्यात आला.
६. या प्रकरणात दबाव येत असल्यामुळेच सुबोध जयस्वाल यांनी केंद्रशासनाच्या सेवेत स्थानांतर करून घेतले. यातील ‘कॉल रेकॉर्ड’मध्ये पैशांच्या देवाणघेवाणीचा उल्लेख असून याविषयी अन्वेषण होणे आवश्यक आहे. याविषयी मुख्यमंत्री एक शब्दही का बोलत नाहीत ?
केंद्रीय गृह सचिवांकडे सीबीआय चौकशीची मागणी करणार !
या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी असेही सांगितले की, मी २३ मार्च या दिवशी देहली येथे जाऊन ही सर्व माहिती केंद्रीय गृह सचिवांकडे देणार आहे. तसेच त्यांच्याकडे या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे.
गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न पूर्णपणे फसला !
नागपूर येथे विलगीकरणात असतांना गृहमंत्री देशमुख विमानाने मुंबईत आले होते. ते अनेक पोलीस अधिकारी आणि अन्य लोक यांना भेटले. याविषयीची पोलिसांकडील माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे. शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना चुकीची माहिती देऊन त्यांच्याकडून चुकीचे बोलून घेतले गेले. एवढ्या मोठ्या नेत्याला चुकीची माहिती देऊन त्यांना उघडे पाडणे चुकीचे आहे. अनिल देशमुख यांना वाचवण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे.