आपत्काळासाठी विविध टिकाऊ खाद्यपदार्थ विकत घेऊन किंवा घरी करून ठेवा !

आपत्काळात स्वयंपाकासाठी इंधनाचा तुटवडा असणे, घरात सर्व जण रुग्णाईत असणे, अचानक अन्य ठिकाणी स्थलांतर करावे लागणे, पेठेत (बाजारात) भाजीपाला न मिळणे इत्यादी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी नेहमीमाणे अल्पाहार आणि भोजन बनवता येईलच, असे नाही. या परिस्थितीत विविध टिकाऊ खाद्यपदार्थ संग्रही असलेले उपयुक्त ठरेल.

१. पुढे दिलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ (उदा. खाकरे, लोणची, पेये) पेठेत विकत मिळतात. ते खरेदी करून ठेवू शकतो. घरीही असे पदार्थ बनवण्याची सवय आतापासूनच ठेवावी; कारण पुढे आपत्काळ जसजसा तीव्र होत जाईल, तसतसे हे पदार्थ पेठेत उपलब्ध होणेही कठीण होईल.

२. पुढे दिलेले पदार्थ उदाहरणस्वरूप आहेत, तसेच ते देतांना अधिकतर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला आहे. वाचकांना त्या त्या राज्यानुसार वा देशानुसार ठाऊक असलेले टिकाऊ पदार्थही खरेदी करता येतील किंवा घरी करता येतील.

३. टिकाऊ पदार्थ बनवण्याच्या कृती बहुतेकांना ठाऊकही असतात. ‘टिकाऊ पदार्थ कसे बनवावेत’, याविषयीची माहिती नसल्यास त्याने ती माहिती कुटुंबातील वडीलधार्‍यांकडून समजून घ्यावी किंवा त्यासाठी पाकशास्त्रावरील पुस्तक वाचावे अथवा या पदार्थांच्या ‘युट्यूब’वर दिलेल्या कृती पहाव्यात. या विषयावर ‘मराठी किचन एक्स्पर्ट  (Marathi kitchen expert) ’ सारख्या भ्रमणभाष  प्रणाल्याही (अ‍ॅप्सही) उपलब्ध आहेत.