कणकवली – नाणार येथील प्रस्तावित महाभयंकर तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातीत नागार, कात्रादेवी, तारळ, चौके, उपळे, तसेच देवगड तालुक्यातील गिर्ये, पुरळ ही गावेच नव्हे, तर संपूर्ण कोकणच उद्ध्वस्त होणार आहे. हा प्रकल्प १४ गावांच्या भूमीवर होणार असल्याने सुमारे ३ सहस्र ३०० कुटुंबे विस्थापित होतील. त्यामुळे कोकणवासियांनी या विनाशकारी प्रकल्पाला कडाडून विरोध केला पाहिजे, असे आवाहन ‘स्वतंत्र कोकण राज्य’ संघटनेचे प्रणेते प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले आहे.
‘स्वतंत्र कोकण राज्य’ संघटनेची सभा येथील कार्यालयात झाली. या सभेत प्रा. नाटेकर बोलत होते. या वेळी जे.जे. दळवी, वाय.जी. राणे, दिलीप लाड, प्रा. सुभाष गोवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कोकणचा विकास नको;पण ते भकास तरी करू नका !
‘कोकणचा विकास करायचा नसेल, तर करू नका; पण निदान कोकण भकास तरी करू नका !’ हे विनाशकारी प्रकल्प केंद्र सरकार लादत नसून राज्य सरकार लादत आहे; म्हणूनच आम्ही ‘स्वतंत्र कोकण राज्या’ची मागणी करत आहोत. राज्यनिर्मिती केल्यास रिफायनरी, अणूऊर्जा, औष्णिक इत्यादी विनाशकारी प्रकल्प आम्ही कोकणात येऊ देणार नाही, असेही प्रा. नाटेकर यांनी सांगितले.