विमा क्षेत्रातून येणारा पैसा देशातच गुंतवला जाणार ! – अर्थमंत्री निर्मल सीतारामन्
नवी देहली – देशातील विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ही ४९ टक्क्यांवरून ७४ टक्के करणारे ‘विमा सुधारणा विधेयक २०२१’ राज्यसभेत पारित करण्यात आले. अर्थमंत्री निर्मल सीतारामन् यांनी म्हटले की, सरकारने विमा क्षेत्रातून येणारा पैसा हा देशातच गुंतवला जाईल, याची कायद्यात तरतूद केली आहे. ‘येथे या पैसा कमवा आणि पळून जा’ असे आम्ही म्हणत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीतारामन् पुढे म्हणाल्या की, वर्ष १९९१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था खुली करण्याचा लाभ झाला. याचा लाभ आपण सर्वच जण घेत आहोत. यासाठी पी.व्ही. नरसिंहा राव आणि डॉ. मनमोहन सिंह यांना त्याचे श्रेय दिले गेले पाहिजे. प्रश्न हा आहे की, आपण हा लाभ या ठिकाणी थांबवून पुढे जाऊ इच्छितो का ? विमा क्षेत्राचा विस्तार होत आहे त्यांना निधीची आवश्यकता आहे.