नामजप करतांना आपोआप भावप्रयोग होऊन त्यातून एकाग्रता आणि आनंदावस्था अनुभवणे

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. नामजप करतांना आपोआप भावप्रयोग होऊन हलके वाटणे

‘२४.७.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमातील आगाशीत बसून नामजप करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर जलाभिषेक करत आहे’, असा भावप्रयोग आपोआप झाला. तेव्हा ‘ते जल त्यांच्या चरणांवर अर्पण होत नसून, माझ्या सहस्रारचक्रातून माझ्या सर्व कुंडलिनीचक्रांवर पडत आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर ‘कुंडलिनीचक्र एका अक्षावर असून तेथे एक पोकळी आहे आणि तेथेच एक काळा प्रवाह आहे. तो प्रवाह त्या जलाने स्वच्छ होत आहे’, असे मला दिसले. हा भावप्रयोग साधारण ५ ते १० सेकंद झाला. त्या वेळी मला हलके आणि थंड वाटले.

२. सप्तचक्रांवरील त्रासदायक शक्ती नष्ट होऊन तेथे पिवळसर पांढरा प्रकाश आणि ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ या नामजपातील प्रत्येक शब्द एकेका चक्रावर दिसणे

काही काळाने पुन्हा तसाच प्रयोग चालू झाला आणि माझ्या देहातील सप्तचक्रांवरील त्रासदायक शक्ती नष्ट होऊन तेथे पिवळसर पांढरा प्रकाश दिसू लागला. त्या प्रकाशाच्या आलंबनात ‘ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ ।’ या नामजपातील शब्द मूलाधारचक्रापासून दिसू लागले. जपातील पहिला ‘ॐ’ मूलाधारचक्रावर, दुसरा ‘ॐ’ स्वाधिष्ठानचक्रावर, ‘नमो’ मणिपूरचक्रावर, ‘भगवते’ अनाहतचक्रावर, ‘वासुदेवाय’ विशुद्धचक्रावर, ‘ॐ’ आज्ञाचक्रावर आणि शेवटचा ‘ॐ’ सहस्रारचक्रावर आहे, असे दिसून माझा नामजप होत होता. एक आवर्तन झाले की, पुन्हा ती अक्षरे तरंगाप्रमाणे हलत होती. त्या वेळी माझा नामजप शब्दांतून नव्हे, तर वेगळ्याच स्थितीत होत होता. ‘ती स्थिती काय होती ?’, हे मला कळले नाही.

३. देहातून आनंदलहरी बाहेर पडत असल्याचे जाणवून मन एकाग्र झाल्यावर ‘ॐ कार’ ऐकू येणे आणि १ घंटा ध्यान लागणे

नामजप करतांना नामजपातील अक्षरे त्या त्या चक्रांवर हलकेच वर जाऊन परत त्या त्या चक्रावर स्थिर होत होती. तेव्हा त्या अक्षरांवर आलंबन होत होते. तेव्हा ‘माझ्या देहातून आनंदलहरी बाहेर पडत आहेत’, असे मला दिसले. चार – पाच वेळा असे झाल्यावर माझे मन एकाग्र झाले. दोन वेळा ‘ॐ’कार ऐकू आला आणि नंतर मन कुठे होते, ते कळलेच नाही. काही काळानी ‘लहान पांढरी फुले फुलली आहेत’, असे मला दिसले आणि त्या फुलांकडे पाहून मला आनंद झाला. मी कृतज्ञता व्यक्त करून डोळे उघडले. तेव्हा १ घंटा झाला होता. इतका वेळ मन एकाग्र आणि शांत होणे (ध्यान लागणे), असे मी प्रथमच अनुभवले.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.८.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक