गेल्या २ वर्षांत २ सहस्र रुपयांची एकही नोट छापलेली नाही ! – केंद्र सरकार

पुढील काळात नोटा छापण्याविषयी मौन !

नवी देहली – केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देतांना ‘वर्ष २०१९-२० आणि वर्ष २०२०-२१ या दोन्ही आर्थिक वर्षांमध्ये २ सहस्र रुपयांची एकही नोट छापली गेली नाही’, असे म्हटले आहे. यापुढील काळात २ सहस्र रुपयांच्या नोटा छापल्या जाणार कि नाही? याविषयी त्यांनी माहिती दिलेली नाही. विशिष्ट मूल्याच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासमवेत चर्चा करून घेत असते. यातून बाजारात नोटांच्या मागणीनुसार योग्य प्रमाणात नोटांचा पुरवठा ठेवता येतो.

अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार ३० मार्च २०१८ या दिवशी देशात २ सहस्र रुपयांच्या ३३६ कोटी २० लाख नोटा होत्या. २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये हाच आकडा २४९ कोटी ९० लाख नोटांपर्यंत खाली आला. त्यामुळे बाजारातून २ सहस्र रुपयांच्या नोटा अल्प होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने नोटा न छापण्याचा निर्णय घेतला.