मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – सुधीर मुनगंटीवर यांनी विधीमंडळात ‘पुढच्या ३ मासांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ’, असे वक्तव्य केले. हा फाजील आत्मविश्वास सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल, तर भाजप स्वत:ची उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल. महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे, ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही, असे लिखाण खासदार संजय राऊत यांनी १४ मार्च या दिवशीच्या दैनिक ‘सामना’मधील रोखठोक या सदरातून केले आहे.
यामध्ये राऊत यांनी लिहिले आहे की,
१. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचे अन्वेषण करून काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य वाखाणण्यासारखेच होते; पण न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते.
२. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले; पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी फडणवीस यांचे आज्ञा मानत होते. अर्णव गोस्वामी यांसारख्यांना पोलिसांनी कुणाच्या आज्ञेवरून वाचवले ? फडणवीस यांनी मनसुख प्रकरणाचे नाट्य उत्तम रीतीने उभे केले; पण पुढे काय ?
३. सुरक्षेचे कारण पुढे करून मुकेश अंबानी यांच्या घरावरील हेलिपॅडला अनुमती मिळावी, यासाठी भाजपने स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले, असे नाना पटोले म्हणाले. पटोले यांच्याकडे याविषयी पुरावे असतील, तर आतंकवादविरोधी पथकाने पटोले यांचेही अन्वेषण करावे.
४. काही दशकांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी किणी या व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण असेच रहस्यमय केले. या प्रकरणाचे भुजबळ अन्वेषण अधिकारीच झाले होते. किणी या मृताचा मेंदूही चोरण्यात आला, असा भन्नाट आरोप करण्यापर्यंत हे प्रकरण पोचले होते. हे प्रकरणही पोकळ पुराव्यांवर उभे असल्यामुळे शेवटी कोसळून पडले. मनसुख प्रकरणाचेही तसेच घडेल.
५. मुंबई पोलिसांच्या अन्वेषणावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात, पोलिसांचे मनोधैर्य नष्ट करतात, हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो. या दबावातून पोलीस आणि प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत.