पसार बाळासाहेब बोठे यांना ३ मासांनंतर अटक

  • अपर्कीतीच्या भयापोटी बोठे यांनी रेखा जेरे यांची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज

  • रेखा जेरे हत्या प्रकरण

बाळासाहेब बोठे आणि रेखा जेरे

मुंबई – नगर येथील ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जेरे हत्याप्रकरणी पसार असलेले मुख्य आरोपी आणि नगर येथील दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार बाळासाहेब बोठे यांना ३ मासांनंतर पोलिसांनी भाग्यनगर (हैद्राबाद) येथून अटक केली. ‘रेखा जेरे या खोटा गुन्हा नोंद करून अपर्कीती करतील या भीतीपोटी त्यांची हत्या केली असावी’, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे; मात्र हत्येमागील नेमके कारण काय आहे ? याचे अन्वेषण पोलीस करत आहेत, अशी माहिती नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी १३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, रेखा जेरे यांची ३० नोव्हेंबर २०२० या दिवशी नगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाट्याजवळील घाटात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण करून आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली होती. यातील आरोपी पत्रकार बाळासाहेब बोठे हे पसार होते. बोठे यांनी मारेकर्‍यांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणली. बोठे यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ५ पथके तैनात करून विविध जिल्ह्यांमध्ये धाडी टाकल्या. तरीही ते सापडले नव्हते. गेल्या ३ मासांत बोठे यांना साहाय्य करणार्‍या ५ जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

रेखा जेरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. वर्ष २०१४ च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. ४ वर्षांपूर्वी रेखा जेरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’ ही संघटना स्थापन केली होती.