तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले !-अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांचा आरोप

डावीकडून अक्षता नाईकआणि आज्ञा नाईक

मुंबई – मनसुख हिरेन प्रकरण आणि अन्वय नाईक प्रकरणांत वेगवेगळा न्याय कसा ? या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांचा सी.डी.आर्. पुरावा काढला होता. फडणवीस मुख्यमंत्री असतांना आमच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यांची आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी असतांनाही फडणवीस यांनी त्याद्वारे दोषींवर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ केली, असा थेट आरोप करून आता मनसुख हिरेन आणि नाईक प्रकरणांत वेगळा न्याय दिसत आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने विशेष अन्वेषण पथकाची (एस्.आय.टी) स्थापना केली असेल, तर ती भूमिका अत्यंत योग्य आहे, असे प्रतिपादन अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक आणि त्यांची पत्नी अक्षता नाईक यांनी ११ मार्च या दिवशी पत्रकार परिषद केले.

आज्ञा नाईक पुढे म्हणाल्या की, नाईक आत्महत्या प्रकरणी एस्.आय.टी.ची स्थापना करायला सरकारला वेळ जरी लागला असला, तरी सरकारने घेतलेली ही भूमिका अत्यंत योग्य आहे. माझ्या बाबांच्या मृत्यूच्या वेळेस युतीचे सरकार होते. तेच सरकार माझ्या बाबांच्या मृत्यूला उत्तरदायी आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी हे आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून धमक्या देत आहेत, तसेच आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु आम्ही त्यांच्या दबावाला बळी पडणार नाही आणि त्याला त्याच्या झालेल्या गुन्ह्याची शिक्षा दिल्याविना आम्ही स्वस्थही बसणार नाही. याचा पाठपुरावा आम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांकडे सतत करणार आहोत. वेळ आली, तर आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांची भेटही घेऊ.