पुण्याला अर्थसंकल्पातून काय मिळणार याविषयी अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा !

श्री. अजित पवार

पुणे – येथील काही महत्त्वाच्या प्रकल्पासाठी वर्ष २०२१-२२ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी महत्त्वाच्या घोषणा आणि तरतूदी केल्या आहेत.

१. पुण्यात १७० किमी लांबीच्या २६ सहस्र कोटींच्या आठ पदरी रिंग रोडचे काम करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादनाचे काम याच वर्षी हाती घेण्यात येणार आहे. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असे अजित पवार यांनी नमूद केले आहे.

२. पुणे-नगर-नाशिक या शहरांदरम्यान जलद रेल्वेला मंजूरी देण्यात आली आहे. २३५ किमी लांबीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार असून, या रेल्वे मार्गासाठी १६ सहस्र १३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महामार्ग कार्यान्वित झाल्यावर पुणे नाशिक हे अंतर प्रवाशांना लोहमार्गद्वारे २ घंट्यात कापता येईल, अशी अपेक्षा आहे. महारेलच्या माध्यमातून पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातून हा प्रकल्प होईल.

३. पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्याची घोषणा या अर्थसंकल्पात झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात बालेवाडी येथे क्रीडा संकुल चालू आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच साथीच्या रोगांचा संसर्ग लक्षात घेता जैव सुरक्षा प्रयोगशाळाही आता पुण्यात साकारणार आहे.

४. पुणे शहरात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली.