मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा त्यांचे भाऊ विनोद यांचा दावा !

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण

मुंबई – काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्याचे मालक मनसुख हिरेन यांचा ५ मार्च या दिवशी संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याविषयी त्यांचे भाऊ विनोद हिरेन यांनी मनसुख हे कधीच आत्महत्या करू शकत नाहीत. ते सुसंस्कारीत कुटुंबातील आहेत. त्यांची हत्याच झालेली आहे, असे आम्हा कुटुंबियांचे मत आहे, असा दावा केलेला आहे.

याविषयी ते म्हणाले, ‘‘मनसुख हिरेन यांच्या हत्येचे अन्वेषण लवकरात लवकर होऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे अन्वेषण वरिष्ठ पातळीवर होणे आवश्यक आहे. पोलिसांना अन्वेषणामध्ये मनसुख पूर्ण सहकार्य करत होते. या प्रसंगामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण नव्हता. त्यांना अन्वेषण अधिकारी तावडे यांचा भ्रमणभाष आल्यामुळे ते ४ मार्च या दिवशी त्यांना भेटायला गेले होते. रात्री आठनंतर त्यांचा भ्रमणभाष लागत नव्हता. त्यामुळे ते आमच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आम्हाला त्यांच्या मृत्यूची वार्ता समजली. त्यांना पोहायला येते त्यामुळे खाडीमध्ये पडून ते आत्महत्या करू शकत नाहीत.’’

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने मनसुख यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झालेला आहे. ते कधीच आत्महत्या करू शकत नाहीत, असे सांगितले.