प्राण्यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘काही सात्त्विक जीव मानवेतर योनींमध्ये (पशू-पक्षी आणि वनस्पती) जन्म घेऊन त्यांचे प्रारब्धातील भोग भोगून संपवतात. ते सात्त्विक ठिकाण अन् सात्त्विक व्यक्ती यांच्याकडे सहजतेने आकृष्ट होतात आणि त्यांच्या सहवासात रहातात. सनातनच्या आश्रमातील सात्त्विकतेमुळे काही प्राणी अन् पक्षी, उदा. फुलपाखरू इत्यादी आश्रमात स्वतःहून येतात. ते आश्रमातील साधक अन् संत यांच्या सहवासात रहातात आणि निघून जातात. अशाच दोन वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि त्यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले संशोधन पुढे दिले आहे.
१. साधिकेला एका झाडाच्या पानावर जांभळ्या आणि निळ्या रंगाचे फुलपाखरू दिसणे अन् ‘त्याला आश्रमात घेऊन जाऊया’, असे तिला उत्स्फूर्तपणे वाटणे
‘५.१२.२०१६ या दिवशी सकाळी मी रामनाथी आश्रमात येतांना मला आनंद होत होता. माझ्या समवेत ‘प.पू. भक्तराजबाबा (प.पू. भक्तराज महाराज) आहेत’, असे मला जाणवत होते. मी काही अंतर चालून गेल्यावर ‘माझ्या डोक्यावर फुलपाखरू बसले आहे’, अशा संवेदना मला जाणवल्या. नंतर काही अंतर पुढे गेल्यावर मला एका झाडाच्या पानावर जांभळ्या आणि निळ्या रंगाचे फुलपाखरू दिसले. त्याला पहाताच मला उत्स्फूर्तपणे वाटले, ‘त्याला आश्रमात घेऊन जाऊया.’ मी फुलपाखराजवळ माझे हात नेले. तेव्हा ते स्वतःहून माझ्या हाताच्या आेंजळीत येऊन बसले. मला पुष्कळ आनंद झाला. मी त्याला आश्रमात घेऊन आले.’ – कु. सिद्धि महेंद्र क्षत्रीय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१२.२०१६)
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चपलांवर एक फुलपाखरू येऊन बसणे
दौर्याच्या वेळी कोर्टालम (तमिळनाडू) येथील ‘हॉटेल लक्ष्मी गार्डन’मधील एका खोलीत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ वास्तव्याला होत्या. २५.९.२०१९ या दिवशी सकाळी १० च्या सुमारास त्यांच्या चपलांवर एक फुलपाखरू येऊन बसलेले दिसले. ते अनुमाने दुपारी २ वाजता ते उडाले. त्यानंतर काही वेळाने ते फुलपाखरू बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या फुलपाखराजवळ हात नेला. तेव्हा ते शुद्धीवर आले आणि त्यांच्या हातावर येऊन बसले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी फुलपाखराला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर ठेवले. थोड्या वेळाने फुलपाखराने तेथेच प्राण सोडले. तेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या की, ‘कोर्टालम हे सिद्धांचे स्थान असल्याने सिद्धच त्या फुलपाखराच्या रूपात येऊन बसले असणार.’ त्यानंतर काही दिवसांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ रामनाथी आश्रमात आल्या होत्या, तेव्हा त्यांनी ते मृत फुलपाखरू समवेत आणले होते.
साधिकेकडील जिवंत फुलपाखराच्या ५.१२.२०१६ या दिवशी आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी समवेत आणलेल्या मृत फुलपाखराच्या ५.१०.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन : दोन्ही फुलपाखरांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन : साधिकेसह आश्रमात आलेले फुलपाखरू आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चपलांवर बसलेले अन् नंतर मृत झालेले फुलपाखरू यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती अन् त्यांची प्रभावळ अनुक्रमे १.११ मीटर आणि १२.९३ मीटर होती.
४. निष्कर्ष
साधिकेसह आश्रमात आलेले फुलपाखरू आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चपलांवर बसलेले मृत फुलपाखरू सात्त्विक असल्याने त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ५’ मध्ये दिले आहे.
५. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
५ अ. साधिकेसह रामनाथी आश्रमात आलेल्या सात्त्विक फुलपाखराने दोन दिवस आश्रमात राहून सर्वांना आनंद देणे : साधिकेसह रामनाथी आश्रमात आलेले फुलपाखरू आनंदाने तेथे बागडत होते. आश्रमातील आध्यात्मिक त्रास नसणारे साधक आणि बालसाधक यांच्याकडे ते सहजतेने जात होते अन् त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांच्याशी वागत होते. संतांकडे गेल्यावर फुलपाखरू ध्यान लागल्याप्रमाणे शांत बसायचे आणि त्यांच्याकडून परत येण्यास सिद्ध नसायचेे. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांकडे ते पटकन जात नव्हते. आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना फुलपाखरातील सात्त्विकतेमुळे स्वतःवर नामजपादी उपाय होत असल्याचे जाणवत होते. हे फुलपाखरू एकूण दोन दिवस आश्रमात राहिले आणि तिसर्या दिवशी उडून गेले. दोन दिवसांच्या वास्तव्यात या सात्त्विक फुलपाखराचे चित्रीकरण, तसेच वैज्ञानिक उपकरणाद्वारे संशोधन करण्यात आले. या फुलपाखरामध्ये १.११ मीटर सकारात्मक ऊर्जा होती. चित्रीकरण झाल्यानंतर साधिका फुलपाखराला संतांच्या खोलीत घेऊन गेली. त्या संतांनी फुलपाखरासमोर हाताची आेंजळ धरली असता ते आनंदाने त्यांच्याकडे उडत गेले. फुलपाखरू त्यांचा हात, खांदा, मान आणि गाल यांवर आनंदाने बागडू लागले. ते संतही फुलपाखराकडे अत्यंत वात्सल्यभावाने, कृपाळू दृष्टीने आणि कौतुकाने पहात होते. नंतर फुलपाखरू बराच वेळ शांत आणि स्थिर होऊन ध्यान लागल्याप्रमाणे त्यांच्या आेंजळीत बसले होते. थोडक्यात फुलपाखरासारखे सात्त्विक जीव सात्त्विक वातावरण, संत अन् साधक यांच्याकडे आकृष्ट होतात आणि त्यांना कशा प्रकारे प्रतिसाद देतात, ते या उदाहरणातून लक्षात येते.
५ आ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चपलांवर बसलेल्या फुलपाखराने सात्त्विक ठिकाणी संतांच्या चरणी प्राणत्याग केल्याने त्याला चांगली गती मिळणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ दौर्याच्या वेळी कोर्टालम (तमिळनाडू) येथे वास्तव्यास होत्या. कोर्टालम हे सिद्धांचे क्षेत्र आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चपलांवर बसलेल्या फुलपाखरामध्ये १२.९३ मीटर म्हणजे पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा असणे, त्याने संतांच्या चपलांवर बसणे, इत्यादी गोष्टींमधून ते सर्वसाधारण फुलपाखरू नसून त्याच्या रूपातील अत्यंत सात्त्विक जीव असल्याचे द्योतक आहे. या फुलपाखराने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दिव्यत्व ओळखले होते. त्यामुळे ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चपलांवर जाऊन बसले. त्याने चपलांमधून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण केले. (‘संतांनी वापरलेल्या चपला या पादुकांसम पवित्र असतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्री महालक्ष्मीदेवीचे रूप आहेत’, असे महर्षींनी सांगितले आहे. – संकलक) काही वेळाने फुलपाखरू बेशुद्ध पडले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या फुलपाखराजवळ हात नेला, तेव्हा ते शुद्धीवर आले आणि त्यांच्या हातावर जाऊन बसले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या फुलपाखराला चैतन्य मिळावे, यासाठी त्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर ठेवले. फुलपाखराने संतांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) छायाचित्रातील चैतन्य ग्रहण करून तेथेच प्राण सोडले. संतांच्या चरणी प्राणत्याग केल्याने फुलपाखराला चांगली गती मिळाली.
थोडक्यात फुलपाखराच्या रूपातील सात्त्विक जिवाने संतांच्या चरणी प्राणत्याग करून जीवनाचे कसे सार्थक करून घेतले, ते या उदाहरणातून लक्षात येते.’
– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.९.२०२०)
ई-मेल : [email protected]