कोणतेही औषध न घेता बिंदूदाबन पद्धतीनुसार उपचार केल्यानंतर साधकाची कंबरदुखी दूर होणे

श्री. राकेश श्रीवास्तव

१. आठ वर्षांपासून साधकाला होणारे विविध त्रास

‘८ वर्षांपासून माझ्या कंबरेमध्ये नेहमी वेदना होत असत आणि माझ्या पाठीचा मणका एकदम कडक झाला होता. त्याचा परिणाम माझ्या हात-पायांवरही झाला होता. त्यामुळे माझी मान नेहमी पुढे झुकलेल्या स्थितीत रहायची आणि मी नेहमी झुकलेल्या स्थितीत चालायचो. मी कुशीवर वळतांना माझ्या पाठीमध्ये असह्य वेदना व्हायच्या. 

२. रामनाथी आश्रमात गेल्यानंतर भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट) श्री. निमिष म्हात्रे यांना भेटून कंबरदुखीच्या त्रासाविषयी सांगणे

मी माझी पत्नी, मुलगी आणि सासू-सासरे यांच्यासमवेत रामनाथी आश्रमात असलेल्या माझ्या मुलाला भेटण्यासाठी गेलो. मी आश्रमात गेल्यावर लगेचच भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट) श्री. निमिष म्हात्रे यांना भेटून मला कंबरदुखीचा त्रास असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला काही व्यायाम आणि बिंदूदाबनाच्या ब्रॅकेटवर पाय ठेवून पाय वर-खाली करणे, असे दिवसातून ३ वेळा करण्यास सांगितले, तसेच पाठीला तेल लावून शेकण्यास सांगितले.

३. सांगितलेले व्यायाम केल्यावर ८ वर्षांपासून असलेला कंबरदुखीचा त्रास दूर होणे, त्यामुळे ‘ईश्‍वराने कंबरदुखी बरी करण्यासाठीच आश्रमात जाण्याचे नियोजन केले’, असे वाटणे

उपचार चालू असतांना प्रत्येक २ दिवसांनी श्री. निमिष माझी तपासणी करत होते. श्री. निमिष यांनी सांगितल्यानुसार मी दिवसातून ३ वेळा व्यायाम करत होतो. त्यामुळे माझ्या मणक्याच्या हाडांमधील घट्टपणा न्यून होऊ लागला आणि ईश्‍वराच्या कृपेने आश्रमातून घरी जातांना माझी कंबरदुखी दूर झाली. मी घरी आल्यानंतरही सकाळी पाठीचा व्यायाम करतो. आता आधीच्या तुलनेत मला चांगले वाटत आहे. आता मला कुशीवर वळतांना कोणत्याही वेदना होत नाहीत. मला कंबरदुखीचा त्रास जवळजवळ ७ – ८ वर्षे होता. अशा प्रकारे कोणत्याही औषधाविना माझी कंबरदुखी दूर झाली. ‘माझी कंबरदुखी दूर करण्यासाठीच ईश्‍वराने माझे आश्रमात जाण्याचे नियोजन केले’, असे मला वाटते.

४. साधकाचा रामनाथी आश्रमाप्रतीचा भाव

‘साधकांचा कितीही गंभीर आजार असेल, तरी रामनाथी आश्रमामध्ये गेल्यावर तो बरा होईल’, असे मला वाटते. साधकांनी केवळ भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट) यांनी सांगितल्याप्रमाणे व्यायाम आज्ञापालन म्हणून करणे आवश्यक आहे.

परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच कोणतेही औषध न घेता माझी कंबरदुखीच्या वेदनांपासून मुक्तता झाली. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. राकेश श्रीवास्तव, सोनपूर (सारण), बिहार. (नोव्हेंबर २०१७)