श्री जोतिबा खेटे आयोजित करू नका ! – जिल्हाधिकार्‍यांचे देवस्थान व्यवस्थापन समितीला पत्र

मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत विधीस अनुमती

कोल्हापूर – कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत. पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करण्यास अल्प मानकरी-पुजारी आणि भाविक यांच्या उपस्थितीत अनुमती देण्यात येत आहे, असे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिवांना पाठवले आहे. देवस्थान समितीला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रत्येक वर्षी श्री जोतिबा खेटे कार्यक्रमाच्या वेळी भाविक आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर अन् परिसरात होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दळवळणबंदीचा कालावधी २८ फेब्रुवारीअखेर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे २८ फेब्रुवारीपासून पुढील ४ रविवार संपन्न होणारे श्री जोतिबा खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत.