भारतच नाही, तर संपूर्ण जगात आमचा एक शेजारी देश आतंकवाद्यांना साहाय्य करत आहे ! 

पाकचे नाव न घेता भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत टीका !

न्यूयॉर्क (अमेरिका) – भारताचा एक शेजारी देश केवळ भारतच नाही, तर जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य करत आहे. याला त्या देशाच्या सरकारचेही समर्थन आहे, अशी टीका भारताच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकचे नाव न घेता केली.

भारताचे प्रतिनिधी नागराज नायडू म्हणाले की, अनेक दशकांपासून भारत प्रत्यक्ष युद्ध आणि सीमापार आतंकवाद यांचा सामना करत आहे. (हे रडगाणे गाऊन भारत काय साध्य करणार आहे ? त्यापेक्षा अशा आतंकवादाला आणि अप्रत्यक्ष युद्धाला भारताने निपटून काढून त्याचे शौर्य या परिषदेत सांगणे आवश्यक आहे ! – संपादक) या शेजारी देशातील सरकार आतंकवाद्यांना प्रशिक्षण, निधी, गुप्त माहिती आणि शस्त्रे पुरवत आहे, म्हणजे त्याद्वारे भारतात हिंसाचार करता येईल. याविरोधात आपण एकत्रित लढा देणे हे सर्वांचे एकत्रित दायित्व आहे. (स्वतः ३ दशके ठोस काही न करता जगासमोर मागणी करणारा अण्वस्त्रधारी हतबल भारत ! – संपादक)