भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात याचिका
मुंबई – मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी योजनेच्या लाभार्थी नसतांना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ६ हून अधिक सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. याविषयी न्यायालयाने मुंबई महानगरपालिका, राज्यशासन आणि झोपडी पुनर्वसन योजना प्राधिकरण यांना २ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
किरीट सोमय्या यांनी याचिकेत म्हटले आहे की,
१. वर्ष २००३ मध्ये वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत गोमाता जनता सहकारी प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामधील २ इमारतींमध्ये सौ. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या सदनिका बळकावल्या आहेत.
२. वरळी विभागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर त्यांनी या सदनिका बळकावल्या आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत मिळालेल्या सदनिका १० वर्षांपर्यंत विकता येत नाहीत; मात्र या प्रकल्पातील सदनिका मुख्य लाभार्थींना न मिळता
सौ. पेडणेकर यांच्या नावे करण्यात आल्या आहेत.
३. वर्ष २०१७ च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सौ. पेडणेकर यांनी उमेदवारी अर्जात या सदनिकांपैकी एका सदनिकेचा उल्लेख रहाता पत्ता म्हणून केला आहे. आता तर या सदनिकांच्या पत्त्यांवर
त्यांनी आस्थापनांची स्थापना केली आहे.
४. ‘या प्रकरणाची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी. सौ. किशोरी पेडणेकर यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना नगरसेविका म्हणून अपात्र घोषित करण्याची कार्यवाही व्हावी’, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.