परभणी – वीजचोरीला आळा बसावा, यासाठी महावितरणद्वारे शहरात नवीन ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी’वर आधारित अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यात येत आहेत; परंतु या मीटरमध्येही फेरफार करून वीजचोरी केली जाते. शहरातील अशा ४ वीज ग्राहकांची वीजचोरी ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिट’द्वारे (डीसीयू) उघडकीस आली आहे. यात त्यांनी मीटरची गती अल्प करून १ लाख ५१ सहस्र ४४९ रुपयांची वीजचोरी केल्याचे समजते. या प्रकरणी त्यांच्यावर वीज कायद्यान्वये गुन्हे नोंद होणार आहेत. (‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिट’ लावले म्हणून ही वीजचोरी निदर्शनास आली. युनिट न लावल्यामुळे आतापर्यंत अनेक जणांनी वीजचोरी केली असेल, त्याला उत्तरदायी कोण ? यामध्ये महावितरणची लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे, ती आता कशी वसूल करणार ? – संपादक)
‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर’ प्रणालीद्वारे होणार्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीजचोरी करत असेल, तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. त्यामुळे ग्राहकांकडून होणार्या वीजचोरीस आळा बसण्यास साहाय्य होणार आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रिडिंगची माहिती येण्यास प्रारंभ झाला आहे. परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण अन्नछत्रे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद क्षीरसागर यांच्यासह जनमित्रांच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी शहरातील माळी गल्ली येथील विद्युत् ग्राहकांच्या मीटरची पडताळणी केली, तेव्हा या ठिकाणी ४ मीटरमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून वीजचोरी होत असल्याचे निष्पन्न झाले.