शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार परत न करणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही !

शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीची चेतावणी

कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही. या मागणीकडे लक्ष देण्यासाठी आंदोलनही करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलन समितीने २३ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

समितीचे पदाधिकारी या वेळी म्हणाले, ‘‘शिवछत्रपतींच्या अनेक तलवारींपैकी करवीर छत्रपती घराण्याकडे असणारी एक ‘जगदंबा’ नावाची तलवार आज इंग्लडच्या राणीच्या व्यक्तिगत संग्रहात असणार्‍या ‘रॉयल कलेक्शन ट्रस्ट’मध्ये ‘सेंट जेम्स पॅलेस’ येथे ठेवण्यात आली आहे. ही तलवार कोल्हापूर छत्रपतींच्या गादीवर छत्रपती महाराज (चौथे) हे अल्पवयीन (११ वर्षे) असतांना, इंग्लंडचे तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स (सातवा एडवर्ड) हे भारत भेटीवर आले असतांना वर्ष १८७५-७६ मध्ये बळजोरीने भेट देण्यात आली. ‘ही तलवार परत आणू’, असे भाष्य अनेकांनी आजपर्यंत केले. प्रत्यक्षात कृती कुणीच केली नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ही तलवार भारतात परत आणण्याची घोषणा केली होती; मात्र ती परत आणण्यासाठी काहीच हालचाल करण्यात आली नाही. सर्व शिवभक्तांच्या भावना या तलवारीशी निगडीत आहेत.’’