गुन्हेगारीचा वाढता आलेख !

पुण्यात दळणवळण बंदीच्या काळात घरफोडी, वाहन चोरी इत्यादी गुन्ह्यांत घट झाली होती; मात्र नियम शिथिल केल्यानंतर या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. गेल्या २ वर्षांत अनुमाने १६ कोटी रुपयांचा ऐवज चोरीला गेला. पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही घरफोड्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. यातून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होते. गुन्हेगारीचा आलेख उंचावण्यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यामध्ये पोलिसांचा वचक असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. गुन्हेगारीवर असा वचक निर्माण करणे आणि ती रोखणे असे महत्त्वाचे दायित्व पोलीस खात्याचे आहे. कायदा-सुव्यवस्था उत्तम रहाणे यांसाठी पोलीस खात्याकडून प्रामाणिक प्रयत्न झाल्यास यामध्ये आमूलाग्र पालट होऊ शकतात. ‘सुरक्षित शहर’ ही पुण्याची ओळख कायम ठेवण्यासाठी कायदा-सुव्यवस्था सक्षम करावी लागणार आहे. शहरातील गुन्हेगारी ही केवळ हाणामारी, हत्या, जाळपोळ, चोर्‍या यांपुरती मर्यादित राहिली नसून व्यसनाधीनता, महिलांची सुरक्षा, बाल लैंगिक अत्याचार आणि ‘ऑनलाईन’ फसवणूक या गंभीर गुन्ह्यांची संख्या प्रतिवर्षी वाढते आहे.

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदला अनुसरून गुन्हे घडण्याचे प्रमाण अल्प होण्यासाठी कठोर शिस्तीची आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांचा धाकच नसेल, तर किरकोळ गुन्हे करणारी व्यक्ती सराईत किंवा अट्टल गुन्हेगार होण्यासाठी वेळ लागत नाही. त्यामुळे नागरिकांना वाटणारी धास्ती न्यून करण्यासाठी आजूबाजूला पोलिसांचा खडा पहारा आहे, हा विश्‍वास त्यांच्यात निर्माण व्हायला हवा. गुन्हेगारांनी कोणतेही गुन्हे करू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वच गुन्हेगारांवर वचक ठेवणे, कारागृहामधून सुटलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हेगारांची अद्ययावत माहिती ठेवणे, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, चोर्‍या, घरफोड्या आणि गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून नियमित पहारा देणे इत्यादी प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे. याचसमवेत १४ ते १८ घंटे काम करणार्‍या पोलिसांचे मनोधैर्य वाढण्यासाठी प्रयत्न करणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा करणे, गुन्हेगारांवर कारवाईचे प्रयत्न तत्परतेने करणे आवश्यक आहेच; पण त्याही पुढे जाऊन गुन्हेगारी समूळ नष्ट होण्यासाठी, त्यांना चांगला माणूस बनवण्यासाठी धर्मशिक्षण देऊन नीतीमान करणे आवश्यक आहे !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे