कैसे वर्णू रूप तुझे देवा । काय ती तुझी महती ।
आस आहे मनाशी । जवळ तू मज केव्हा घेशी ॥ १ ॥
तुझे नाम घेण्यास । ओठ सिद्ध आहेत ।
पण बुद्धीत उठणार्या वादळाला । आस तुझ्या दर्शनाची आहे ॥ २ ॥
विचारांत गिरक्या घेणारे मन । हुंदडत राही चहू दिशांनी ।
तरीही हा म्हणत राहे । मला दिशा न भेटे ।
ईश्वरप्राप्तीच्या वाटेची ॥ ३ ॥
काय आहे हा छळ । काय आहे ही माया ।
देवा, सांग आता तरी । त्यागून माया, तोडून सारे पाश ।
तरी मी का गुंतलो या मायेच्या बंधनात ॥ ४ ॥
कैसे वर्णू गुण तुझे देवा । आहे अपार कीर्ती आणि महती ।
किती ते अवगुण आमचे देवा । तरीपण आम्ही तुला म्हणतो ।
चूक-भूल क्षमा कर अन् । आम्हाला आशीर्वाद दे ॥ ५ ॥
आहे किती रे स्वार्थीपणा । आहे कीती रे लोभ ।
सर्वकाही मिळूनही । असंतोषी आम्ही आहोत ॥ ६ ॥
काय वर्णू तुझी प्रीती देवा । किती रे भोळा सदाशिव तू ।
शिशुपालाचे शंभर अपराध होऊनही । मुक्ती त्याला दिलीस तू ॥ ७ ॥
क्षमा कर देवा मला । ना मी होऊ शकलो सुदामा ना अर्जुन ।
तरीपण म्हणे देव आला धावून ॥ ८ ॥
सर्वश्रेष्ठ भक्त आहे हनुमान । तर सर्वप्रिय मित्र आहे सुदामा ।
एकच विनंती देवा, करशील ना पूर्ण ॥ ९ ॥
भले मला श्रेष्ठ भक्त नको बनवू । भले मला सर्वांत प्रिय मित्र नको म्हणू ।
पण तुझ्या चरणांपासून दूर नको लोटू ॥ १० ॥
– श्री. केदार हिरालाल तिवारी, कोल्हापूर (८.७.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |