मुंबई – हमीभावापेक्षा अल्प दराने साखर विक्री करणार्या, तसेच साखरेचा कोटा स्थिर न ठेवणार्या साखर कारखान्यांवर फौजदारी कारवाई करण्याची चेतावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १२ फेब्रुवारी या दिवशी दिली.
१. ‘देशांतर्गत अतिरिक्त झालेल्या साखरेच्या उत्पादनाचे व्यवस्थापन व्हावे, देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची किंमत स्थिर रहावी आणि ऊस उत्पादक शेतकर्यांना उसाची चांगली किंमत मिळावी’ यासाठी केंद्र शासनाने साखरेच्या विक्रीची किमान आधारभूत किंमत प्रतीक्विंटल ३ सहस्र १०० रुपये निश्चित केली आहे.
२. बाजारातील साखरेच्या मागणी-पुरवठ्यावरील समतोल राखण्यासाठी प्रत्येक कारखान्याने प्रत्येक मासाला खुल्या बाजारात किती साखरेची विक्री करावी याचा कोटा ठरवून दिला आहे.
३. राज्यात यंदा साखरेचे विक्रमी ९७३ लाख टन उत्पादन होण्याची अपेक्षा असून आतापर्यंत ६६० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अजूनही मासभर गळीत हंगाम चालण्याची अपेक्षा आहे.
४. अनेक साखर कारखाने शेतकर्यांना उसाचे पैसे देण्यासाठी साखरेच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा अल्प दराने साखर खुल्या बाजारात विकत आहेत. त्यामुळे देशांतर्गत साखरेच्या किमती घसरत आहेत. याची नोंद घेत अशा साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत.