‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्यास प्रोत्साहन द्या !

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पणजी, १२ फेब्रुवारी – गेल्या काही वर्षांत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतातही रूढ झाली आहे. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली गेली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्‍वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करण्याच्या नावाखाली हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते. या अपप्रकारांना आळा घालण्यासाठी काही समाजसेवी संघटना मागील काही वर्षांपासून ‘मातृ-पितृ पूजन दिना’च्या माध्यमातून युवा पिढीसमोर एक आदर्श पर्याय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे ‘मातृ-पितृ पूजन दिन’ या उपक्रमातून आपल्या माता-पित्यांना सौजन्य आणि सन्मान देण्याची भावना वाढीस लागते. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांचे प्रमाण पहाता महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य निर्देश द्यावेत.