‘पुणे जिल्ह्यात दळणवळण बंदी चालू झाल्यापासून, म्हणजे एप्रिल २०२० पासून ‘सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक चांगली व्हावी’, यासाठी सौ. मनीषा पाठक प्रतिदिन ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संग घेतात. ‘त्यांनी सांगितलेल्या सूत्रांनुसार कसे प्रयत्न केले ?’, हे साधक नंतरच्या सत्संगांत सांगतात. मी ‘त्यानुसार केलेले प्रयत्न आणि मला जाणवलेले पालट’, यांविषयी येथे दिले आहे.
१. गुरुलीला सत्संग चालू होण्यापूर्वीची स्थिती
‘आधी माझ्या साधनेची स्थिती चांगली नव्हती. माझे स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे निरीक्षण अल्प पडत होते. मला माझ्यातील १ – २ स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लक्षात यायचे. माझे त्या दृष्टीने प्रयत्नही होत नव्हते. ‘माझी साधना वरवरची होत होती’, असे मला जाणवले.
२. गुरुलीला सत्संग चालू झाल्यानंतरची स्थिती
२ अ. स्वतःतील अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू लक्षात येणे अन् ते दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे : सत्संग चालू झाल्यावर ‘स्वतःतील अनेक स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू’ माझ्या लक्षात आले. मी ते एका कागदावर लिहून ते दूर होण्यासाठी प्रयत्न चालू केले. ‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांची व्याप्ती काढणे मला सोपे झाले. मी प्राधान्याने ‘आळशीपणा आणि रागीटपणा’ हे स्वभावदोष, तसेच ‘कर्तेपणा आणि प्रतिमा जपणे’ हे अहंचे पैलू दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. सत्संगात वेगवेगळे दृष्टीकोन मिळाल्यामुळे माझ्या प्रयत्नांना गती मिळाली आणि माझे प्रामाणिकपणे प्रयत्न चालू झाले. मी त्यासाठी घरातील व्यक्तींचे साहाय्य घेत आहे. मी ‘प्रत्यक्ष रामनाथी आश्रमात आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न चालू केले.
२ आ. केलेले प्रयत्न : माझ्याकडून स्वभावदोषांच्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी आवरणे, ज्या कृतीचा कंटाळा आहे, ती प्राधान्यक्रमाने करणे, नियोजन करून घरातल्या सर्व कृती करणे, असे प्रयत्न झाले.
२ इ. जाणवलेले पालट
२ इ १. चूक झाल्यास क्षमायाचना करणे : माझ्याकडून चूक झाल्यास मला कान पकडून यजमान आणि मुलगी यांची क्षमा मागता आली. सासूबाईंची क्षमा मागण्यासाठी माझा २ दिवस संघर्ष झाला. त्यानंतर मी त्यांचीही क्षमा मागितली. नंतर मला हलकेपणा जाणवला.
२ इ २. शारीरिक त्रासांवर मात करता येणे : मी प्रतिदिन ‘शरिराचा कुठलातरी भाग दुखतो’, हे सतत यजमान, मुलगी गौरी आणि साधक यांना सांगायचे. तेव्हा मी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असे. ‘मी किती करते, किती दमते’, असे मला वाटायचे. तेव्हा ‘हे माझे प्रारब्ध आहे आणि ते मला आनंदाने भोगायचे आहे’, हा विचार होत नसे. आता माझा तसा विचार होत असल्याने मला शारीरिक त्रास आनंदाने सहन करता यायला लागले. ‘देवाने मला किती चांगल्या स्थितीत ठेवले आहे !’, याविषयी माझ्या कृतज्ञताभावात वाढ झाली.
२ इ ३. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया आनंदाने करता येणे : प्रतिदिन केलेल्या प्रयत्नांमुळे दोन स्वभावदोष आणि अहंचे पैलू यांवर मला काही प्रमाणात मात करता येऊ लागली आहे. त्यासाठी माझा ‘सतत देवाचे साहाय्य घेणे, अनुसंधानात रहाणे’, हा भाग वाढला आहे. त्यामुळे मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करण्याचा ताण न येता ती आनंदाने करता येते. मी केलेल्या प्रयत्नांविषयी सत्संगात सांगितले. आधी ‘मला योग्य प्रकारे सांगता येईल का ?’, अशी भीती वाटायची. आता ‘मला पालटायचे आहे आणि प.पू. गुरुदेवांच्या चरणी लवकरात लवकर जायचे आहे’, असा विचार असतो. ‘त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करायचे’, असा माझा निश्चयही झाला आहे. त्यामुळे देव भरभरून आनंद आणि अनुभूतीही देत आहे.
२ इ ४. श्रद्धा वाढणे : बाहेर गंभीर परिस्थिती असली, तरी देव मला काहीच न्यून पडू देत नाही. त्यामुळे ‘दळणवळण बंदीनंतर काय होणार ?’, याची काळजी न वाटता मला पुष्कळ स्थिर रहाता येते. माझे भूतकाळाविषयीचे विचार न्यून झाले. ‘वर्तमानात जी स्थिती आहे, त्यात आनंदात रहायचे’, एवढाच माझा विचार असतो. त्यामुळे मला प.पू. डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘माझी श्रध्दा वाढली आहे’, हेही माझ्या लक्षात आले.
३. अनुभूती
अ. एकदा सत्संग चालू असतांना मला केवड्याचा सुगंध आला.
आ. एकदा सत्संग चालू असतांना ‘मी वैकुंठलोकात क्षीरसागरात आहे’, हे मला अनुभवता आले.
इ. आता ‘मला केवळ प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी आनंदी फूल बनून रहायचे आहे’, हा निश्चय झाल्याने साधना आणि व्यवहार यांत मला आनंद मिळत आहे.
ई. घरातील सगळ्यांनी मिळून प्रयत्न चालू केल्यावर मला घरात अनेक पालट जाणवले. घरात दैवी कण आढळतात. घरात फुलपाखरांचे येणे वाढले आहे. घरातील जास्वंदीच्या झाडावर एकाच वेळी ९ किंवा ५ फुले येतात. या आधी कधीच एवढ्या प्रमाणात फुले आली नव्हती.
गुरुचरणी अर्पण !’
– सौ. अंजली फणसळकर, कोथरुड, पुणे. (३०.४.२०२०)