मृदुभाषी, सेवेची तळमळ आणि श्रीकृष्णाप्रती भाव असलेल्या इंग्लंडहून रामनाथी आश्रमात साधनेसाठी आलेल्या कु. अ‍ॅलिस !

माघ शुक्ल पक्ष द्वितीया (१३.२.२०२१) या दिवशी कु. अ‍ॅलिस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. अ‍ॅलिस यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. कु. हर्षदा दातेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (कलेच्या संदर्भात सेवा करणारी साधिका)

१ अ. मृदुभाषी : ‘कु. अ‍ॅलिस मुळातच मृदुभाषी आहे. ती बोलतांना समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन बोलते. हे करतांना तिच्या आवाजाच्या पट्टीत चढ-उतार होत नाहीत. तिला लहान-मोठ्या सर्वांविषयी आदर वाटतो आणि तिच्या बोलण्यातून तो जाणवतो. तिचे बोलणे कानांना गोड वाटते आणि ते ऐकत रहावेसे वाटते.

१ आ. तिचे हसणे लहान मुलांप्रमाणे निरागस असून ते मनाला आनंद देते.’

२. कु. संध्या माळी आणि कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (कलेच्या संदर्भात सेवा करणार्‍या साधिका)

२ अ. नम्रता : ‘ती सर्वांशी नम्रतेने बोलते.

२ आ. जिज्ञासू वृत्ती : एखादी गोष्ट बघितली की, ‘हे तुम्ही कसे केले आहे ?’, हे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते.

२ इ. अभ्यासू आणि शिकण्याची वृत्ती : तिला सुचलेल्या नक्षीचा ती चांगल्या प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. सेवा करतांना ‘विविध स्पंदनांचा अभ्यास कसा करायचा ?’, हे ती विचारते. त्याप्रमाणे अनुभवण्याचा ती प्रयत्न करते. अल्प कालावधीत अ‍ॅलिस पुष्कळ सेवा शिकली. तिची ग्रहण करण्याची क्षमता पुष्कळ आहे.

२ ई. विचारण्याची वृत्ती : अ‍ॅलिसला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. ‘त्रास होत असतांना काय करायला हवे ?’, हे ती लगेच उत्तरदायी साधिकांना विचारते आणि जे सांगितले आहे, ते करण्याचा प्रयत्न करते. तिला सेवेत येणार्‍या लहान लहान अडचणीही ती आम्हाला विचारते.

२ उ. सेवेची तळमळ : त्रास होत असतांनाही ती सेवेला येते. ‘सर्व गोष्टी सात्त्विक व्हायला पाहिजेत’, असे तिला वाटत असते. ती ‘फोटोशॉप’ या संगणकीय प्रणालीत सेवा करते. तेव्हा तिला ‘फोटोशॉप’मधील काही येत नसेल, तर ती माहितीजालावर शोधून ते शिकते आणि ती अडचण सोडवते अन् सेवा पूर्ण करते.

२ ऊ. परिस्थिती स्वीकारणे : एकदा अ‍ॅलिस सेवेला आल्यावर तिचा संगणक तांत्रिक अडचणींमुळे पुष्कळ वेळ चालू होत नव्हता. त्यामुळे तिला दुसरी सेवा करायला दिल्यावर ती सेवा अ‍ॅलिस मनापासून करायला लागली. तिचा संगणक चालू झाला होता. त्याकडे तिचे लक्ष नव्हते. ‘तेवढ्यात संगणक आपोआप चालू झाला आहे’, असे सांगितल्यावर तिला पुष्कळ आनंद झाला.

२ ए. चुकांविषयीची संवेदनशीलता : तिच्याकडून झालेल्या चुका ती लगेच सांगते. ‘त्यात काय करायला हवे ? कसा विचार असायला हवा ?’, हे ती विचारते. चुका झाल्यावर तिला त्याची खंत वाटते.

२ ऐ. अहं अल्प असणे : लहानपणापासून तिचा विविध कलांचा पुष्कळ अभ्यास आहे; पण इतरांच्या सेवेतील एखादी गोष्ट लक्षात आली की, थेट न सांगता ती विचारते, ‘‘जे माझ्या लक्षात आले, ते योग्य आहे का ?’’

२ ओ. सात्त्विक गोष्टींची आवड : ती बर्‍याचदा नऊवारी आणि सहावारी साडी नेसते. रांगोळी आणि मेंदी काढणे अशा सगळ्या गोष्टी ती शिकली अन् आवडीने करते.

२ औ. भाव

२ औ १. संतांप्रती भाव : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ मराठी भाषेत बोलतात. ‘त्यांचे बोलणे कळावे, त्यांच्याशी बोलता यावे’, यासाठी ती मराठी वाचायला आणि बोलायला शिकत आहे.

२ औ २. श्रीकृष्णाप्रती भाव : तिचा श्रीकृष्णाप्रती पुष्कळ भाव आहे. तिला स्वतःला ‘ती गोपी आहे’, असे जाणवते.’