खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट !

केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना विविध मागण्यांचे निवेदन देतांना (डावीकडे) खासदार उदयनराजे भोसले

सातारा, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – माण-खटाव तालुक्याच्या विकासात भर घालणार्‍या माननीय गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार अर्थात जिहे-कठापूर या महत्त्वाकांक्षी योजनेस केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ५३७ कोटी रुपये दिले आहेत. ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडून आवश्यक तो निधी देण्याचे आश्‍वासन जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले. या योजनेच्या पूर्ततेसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देहली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या वेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, योजनेमुळे २७ सहस्र ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने माण-खटाव तालुक्यातील ६७ गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा कायमस्वरूपी प्रश्‍न सुटणार आहे. महाराष्ट्रातील अनेक सिंचन प्रकल्पांसाठी केंद्रशासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे; मात्र काही प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. रखडलेल्या प्रकल्पांची पूर्तता करण्यासाठी केंद्रातून अधिकाधिक निधी उपलब्ध करण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. कृष्णा नदीच्या शुद्धीकरणाविषयी नदीच्या उगमापासून संगमापर्यंत कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्याविषयी केंद्रीय जल आयोगाच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येईल, याविषयी मंत्री महोदयांंशी चर्चा झाली. तसेच शिवकालीन तळ्यांचा पुनर्विकास करण्याविषयी मंत्रीमहोदयांची चर्चा झाली. सातारा जिल्ह्यात अनुमाने २० गड-किल्ले असून त्यांवर शिवकालीन तळी अस्तित्वात आहेत. या तळ्यांचा जिर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने केंद्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

या वेळी केंद्रीय जनशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले की, सर्व गड-किल्ल्यांवरील जलस्रोतांचा अभ्यास करून त्याविषयी कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देता येईल, असा अभ्यास केला जाईल. याविषयी विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल. गड-किल्ल्यावरील जलस्रोत भक्कम करण्यासाठी किल्ल्यांवरील शिवकालीन तळ्यांचा विकास कसा करायचा, तळी नेमकी कशी स्वच्छ करायची, याविषयीचा अहवाल शासनाच्या वतीने आम्ही लवकरात लवकर मागवून घेऊ आणि त्यानुसार कार्यवाही करू.