खासदार विनायक राऊत यांना मारहाण करण्याची धमकी दिल्याचा आरोप
कणकवली – भाजपचे नेते तथा माजी खासदार नीलेश नारायण राणे यांनी ९ फेब्रुवारी या दिवशी एक ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमातून (सोशल मीडियावर) प्रसारित केला आहे. यामध्ये शिवसेना सचिव खासदार विनायक भाऊराव राऊत यांच्या विरुद्ध अवमानकारक आणि प्रक्षोभक विधान करून त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कणकवलीचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले की, माजी खासदार नीलेश राणे यांनी खासदार राऊत यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची स्थिती निर्माण झाली आहे, तसेच माजी खासदार राणे धमकी देत असलेला ‘व्हिडिओ’ प्रसारित करून खासदार राऊत यांचा अवमान केला गेला आहे.
या वेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उप जिल्हाप्रमुख राजू शेट्ये, सुजित जाधव, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, युवा सेनेचे गीतेश कडू, नासीर शेख आदी उपस्थित होते.