हितेंद्र ठाकूर यांच्या ‘विवा’ समूहाची ३४ कोटींची मालमत्ता कह्यात

हितेंद्र ठाकूर

मुंबई – ‘विवा’ समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतली आहे. वसई-विरार येथील जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर आणि त्यांचे भाऊ आमदार हितेंद्र ठाकूर यांची ही मालमत्ता आहे. पी.एम्.सी. अधिकोषातील घोटाळ्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

पी.एम्.सी. अधिकोषातून कर्ज घेऊन त्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी काही उद्योगसमूहांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने मागील मासात ‘विवा समूहा’ची कार्यालये; तसेच ठाकूर बंधूंच्या घरांवर धाडी टाकल्या होत्या. या वेळी हाती आलेल्या माहितीच्या आधारे ठाकूर यांची अंधेरीतील मालमत्ता कह्यात घेण्यात आली आहे.

अंधेरी पूर्वेकडील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता ‘मॅक स्टार’ या आस्थापनाने बांधली आहे. ‘मॅक स्टार’ ही ‘हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ची (एच्.डी.आय.एल्.) उपकंपनी आहे. ‘एच्.डी.आय.एल्’ ही पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील सर्वांत मोठे कर्जबुडवे आस्थापन आहे. ‘एच्.डी.आय.एल्’, मॅक स्टार आणि ‘विवा समूह’ यांचे संगनमत असल्याचे तपासात समोर आले. त्यावरूनच अंधेरीतील ही कारवाई करण्यात आली.