१. गायत्री मंत्र केव्हाही आणि कुठेही बसून म्हणून नये !
‘भगवंतप्राप्ती गुरुकृपेने होते खरी; पण गुरु भगवंतकृपेविना मिळत नाही. कृपा ही नाम, भक्ती, भाव, समाधान आणि शांती यांमुळे प्राप्त होते. नाम गुरु देतात. ते भगवंताचे असते. त्या नामगंगेत प्रतिदिन स्नान करावे लागते. वैद्य औषध देतो आणि पथ्य सांगतो. औषधाइतकेच पथ्य महत्त्वाचे असते. ‘ॐ भू ॐ र्भुवः’ हे तू सांगितलेस देवा; पण त्याचे कडक पथ्य सांगितले नाहीस. नाम कधी, कुठे आणि केव्हाही घेऊ शकतो; परंतु मंत्र कधीही, कुठेही आणि केव्हाही म्हणता येत नाहीत. पलंगावर बसून, सोफ्यावर बसून, दूरचित्रवाहिनी पहात, स्नान न करता, धूत वस्त्रे न घालता, येता-जाता आणि रात्री हा महान गायत्री मंत्र म्हणायचा नसतो.
२. मंत्राचे उच्चार स्पष्ट आणि सुवाच्य हवेत. नाहीतर चुकीच्या स्पंदनांमुळे शरिरात व्याधी निर्माण करतात.
३. चुकीच्या पद्धतीने मंत्र म्हटल्यास त्रास होण्याची शक्यता असणे
वैद्य रुग्णाची प्रकृती पाहून औषधे देतात. औषध जरी तेच असले, आजारही तोच असला, तरी इतरांनी दिल्यास चूक होऊ शकते. त्या चुकीचे फळ देणार्याला मिळते, तसेच चुकीच्या पद्धतीने मंत्र म्हणण्याने होऊ शकते.
पथ्य सांगून द्यावा ना मंत्र ।
मंत्राचेही असते एक तंत्र ॥ १ ॥
उपनयनाच्या आधी देतात का पुरोहित गायत्री मंत्र ।
आधी इतर मंत्र-तंत्राने शुद्धी करूनच देतात हा महान मंत्र ॥ २ ॥
आजकाल ना या मंत्राचे महत्त्व, ना जानव्याचे महत्त्व ! आई-वडिलांनाही याची जाणीव नाही. त्याची फळे ते येणार्या काळात भोगणार आहेत. जानवे आणि मंत्र याचे महत्त्व पहा. एक ब्राह्मण जंगलातून जात होता. चोरांनी त्याला लुटले आणि त्याला मारायचे ठरवले. अकस्मात् चोरांना त्याचे जानवे दिसले. चोर म्हणाले, ‘‘तू ब्राह्मण आहेस. ब्रह्महत्या नको, तू जा.’’ ब्राह्मण मनात म्हणाला, ‘कदाचित् माझ्याकडे तलवार असती, तरी मी स्वतःचे रक्षण करू शकलो नसतो; पण या जानव्याच्या अंगातील शक्तीने माझे प्राण वाचवले. खरे ना देवा ?’
या महान गायत्री मंत्राचा अवमान होऊ नये; म्हणून कृपया सर्वांनाच देऊ नकोस, ही नम्र विनंती. विनंतीचा अव्हेर न व्हावा.
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (२१.८.२०२०)