गोवंश आणि स्मृतीग्रंथ

स्मृतीग्रंथामध्ये गोवंशाची काळजी कशी घ्यावी ?, याविषयी काही श्‍लोक दिले आहेत, ते वाचले की, आपण अनेक आक्षेपांना साधार उत्तर देऊ शकतो.

द्वौ मासौ पालयेद्वत्सं द्वौ मासौ द्वौ स्तनौ दुहेत् ।
द्वौ मासौ चैकवेलायां शेषं कालं यथेच्छया ॥

– दाल्भ्यस्मृति, श्‍लोक १११

अर्थ : गाय व्यायली की, २ मासांपर्यंत गोमातेच्या चारही सडातले (आचळांतील) दूध वासराला द्यावे. पुढील २ मासांमध्ये दोन सडातले दूध वासराकरता आणि दोन सडातील दूध आपण घ्यावे. पुढच्या २ मासांत एक वेळचे दूध पूर्णपणे आपण घ्यावे आणि एक वेळचे वासराला द्यावे. ६ मास अशा पद्धतीने पूर्ण करावे. नंतर वासरू मोठे झाले की, चारा वगैरे ते खाऊ लागते आणि त्यानंतर सर्व दूध आपण ठेवावे.

वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

हले वा शकटे चैव दुर्बलं यो नियोजयेत् ।
प्रत्यवाये समुत्पन्ने तत: प्राप्नोति गोवधम् ॥

– दाल्भ्यस्मृति, श्‍लोक १०१

अर्थ : जोताला किंवा बैलगाडीला अथवा रहाटाला दुर्बळ किंवा निर्दिष्ट संख्येपेक्षा अल्प संख्येने बैल जोडणारा पापी होतो आणि त्यास गोवधाचे पातक लागते.

त्यामुळे बैलांची योग्य ती काळजी घ्यावी. काही बुद्धीवादी मंडळी हे ऐकल्यावर लगेच प्रतिप्रश्‍न करतात की, पशुवैद्यक तज्ञ गायींवर उपचार करतांना काही प्रसंगी शस्त्रचिकित्सा करतात, तेही हिंसेत येत का ? यावर आपस्तंब स्मृतीत ठामपणे मत दिले आहे,

यन्त्रणे गोश्‍चिकित्सार्थे मूढगर्भविमोचने ।
यत्ने कृते विपत्तिश्‍चेत् प्रायश्‍चित्तं न विद्यते ॥

– आपस्तम्बस्मृति, अध्याय १, श्‍लोक ३२

अर्थ : गोवंशाची रोगचिकित्सा करतांना किंवा शरिरातील मृतगर्भ काढतांना जर शस्त्रक्रिया करावी लागली, तर त्यात पाप (विपत्ती) नाही (तर पुण्यच आहे) आणि याकरता प्रायश्‍चित्त नाही.

औषधं लवणञ्चैव स्नेहपुष्ट्यन्नभोजनम् ।
प्राणिनां प्राणवृत्त्यर्थः प्रायश्‍चित्तं न विद्यते ॥

– आपस्तम्बस्मृति, अध्याय १, श्‍लोक ११

अर्थ : प्राण्यांचे रक्षण व्हावे, याकरता औषध, मीठ, तेल अथवा पुष्टीकारक अन्न देणे, हे गैर नसून पापकारक नाही. त्यामुळे याचे प्रायश्‍चित्त नाही. (हे वैद्याच्या सल्ल्याने करावे) तेव्हा आपण ठामपणे सांगू शकतो की, आमचा धर्म हा प्राणीमात्रांचीही काळजी घेणारा आहे.

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग.