हिंदूंचे वाढलेले दायित्व !

इस्रायली दूतावासासमोर झालेल्या स्फोटामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी न ऐकलेल्या जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेचे नाव पुढे आले असून या संघटनेने स्फोटाचे दायित्व स्वीकारले आहे. साधारण आतंकवादी संघटना एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट केल्यावर त्याविषयी गप्प रहाणे पसंत करतात; कारण एकदा कुणी स्फोट केला, हे समोर आले, तर त्या देशाच्या गुप्तचर संघटना हात धुवून संबंधित आतंकवादी संघटनेच्या मागे लागतात आणि त्या संघटनेचा संपूर्ण नायनाट केल्यावरच गप्प बसतात. यासंदर्भात इस्रायल आणि अमेरिका यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील.

जैश-उल्-हिंद ही तशी अलीकडेच स्थापन झालेली आतंकवादी संघटना; मात्र तरीही ‘आम्ही स्फोट घडवून आणला’, हे या संघटनेने घोषित केले आहे. यावरून या संघटनेला ‘आमचे कुणीही काहीही बिघडू शकणार नाही’, याचा आत्मविश्‍वास असल्याचे दिसून येते. हे भारतीय सुरक्षायंत्रणांसाठी लज्जास्पद आहे. भारतीय सुरक्षायंत्रणांचा आतंकवाद्यांना धाक राहिलेला नाही का ? अशा आतंकवादी संघटनांवर अजूनही सुरक्षायंत्रणांनी वचक का बसवला नाही ? दुसरे म्हणजे या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या संभाषणाची माहिती समोर आली आहे. त्यात ‘अल्लाच्या कृपेने आणि साहाय्यामुळे स्फोट घडवणे शक्य झाले’, असे एक आतंकवादी म्हणतांना दिसून येते आहे. हे हिंदूंसाठी चिंताजनक आहे. जिहादी आतंकवाद्यांनी ‘काफीर’ हिंदूंच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. जिहादी आतंकवादी आणि धर्मांध यांना भारताचे इस्लामिस्तान करायचे आहे. त्यासाठी ते हिंदूंना थेट आव्हान देत आहेत; मात्र काही हिंदू वगळता अन्य हिंदू हे निद्रिस्त आहेत. काहींना ‘धर्मनिरपेक्ष’तेने ग्रासले आहे. त्यामुळे ते अशा धमक्यांकडे दुर्लक्ष करतात; मात्र या धमक्या दुर्लक्षून चालणार नाही. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आतंकवादी आज मोकाट आहेत. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद करून जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरमध्ये स्वतःचे बस्तान मांडले. त्याचा त्याच काळात जर निःपात केला असता, तर आज भारतात शांतता नांदली असती. आज तेच आतंकवादी हिंदूंच्या मुळावर उठले आहेत. भारतात हिंदूंचा वंशसंहार करण्याचा त्यांनी घाट घातला आहे. असे असतांना हिंदू त्यांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहेत का ? किती हिंदू हे जिहादी आतंकवाद्यांच्या धमक्यांना गांभीर्याने घेतात ? जे काश्मिरी हिंदूंनी भोगले, ते भोग उद्या भारतात वास्तव्य करणार्‍या कुठल्याही राज्यातील हिंदूंच्या वाट्याला येऊ शकतात. त्यामुळे जिहादी किंवा धर्मांध यांच्या कुठल्याही धमक्यांकडे दुर्लक्ष न करता हिंदूंनी अशा घटनांकडे चौकस वृत्तीने पहाणे आवश्यक आहे. सध्या धर्मांधांकडून हिंदूंवर होणारी आक्रमणे पहाता, पोलीस आणि प्रशासन हिंदूंच्या साहाय्याला येत नाहीत, असेच चित्र आहेत. त्यामुळे हिंदूंना स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर हिंदूंनी धर्मबळ वाढवणे आवश्यक आहे. धर्मबलसंपन्न हिंदूच धर्मांधांवर वचक निर्माण करू शकतील, हे निश्‍चित !