संपूर्ण देशात ज्या वेब सिरीजमुळे वादंग माजला आहे, ज्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे, त्या प्रकरणी एका आमदारने केलेल्या तक्रारीच्या विरोधात गुन्हा नोंद व्हायला एवढा वेळ लागतो, तर सामान्य माणसाची काय स्थिती असेल, याची यावरून कल्पना येते !
मुंबई – देवतांचे विडंबन करणार्या ‘तांडव’ या वेब सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माते हिमांशू कृष्णा, ओरिजिनल कन्टेंट विभागाच्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित, गौरव सोलंकी, झिशान आणि अन्य कलाकार यांच्यावर घाटकोपर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन जमातींमध्ये तेढ निर्माण करणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे या संदर्भातील १५३ (अ), २९५ (अ), ५०५ (२) ही कलमे त्यांच्यावर लावण्यात आली आहेत.
पंतप्रधानपदाची अस्मिता धुळीला मिळवणार्या, अनेक राष्ट्रद्रोही प्रसंग चित्रित करणार्या आणि राष्ट्रद्रोह्यांचा उदोउदो करणार्या या वेब सिरीजच्या विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी बीकेसी येथे, तर मुंबई भाजपचे सचिव शर्मा यांनी कस्तुरबा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार प्रविष्ट केली होती. या वेळी या वेब सिरीजचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा नोंद करण्याची मागणी गेले दोन दिवस राम कदम करत होते. खासदार मनोज कोटक यांनीही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून ‘वेब सिरीजच्या निर्मात्यांनी क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईला येणार
‘तांडव’ या वेब सिरीजच्या विरोधात उत्तरप्रदेशच्या हजरतगंज पोलीस ठाण्यामध्ये पूर्वीच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईला येणार आहे.