मगोच्या अध्यक्षपदी दीपक ढवळीकर
फोंडा – १८ जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत मगो पक्षाची केंद्रीय समिती घोषित करण्यात आली. १७ जानेवारीला झालेल्या केंद्रीय समितीच्या निवडणुकीत श्री. दीपक ढवळीकर ४०९ मतांनी विजयी ठरल्याने त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. या वेळी श्री. दीपक ढवळीकर यांनी आपण विधानसभेची निवडणूक प्रियोळ मतदारसंघातून लढवणार अशी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘शिरोड्यातूनही मगो सक्षम उमेदवार देणार आहे. ‘मगो संपला’, अशी हाकाटी पिटणार्यांना हा निकाल ही चपराक आहे. मगोतून हकालपट्टी केलेल्यांना हाताशी धरून विरोधी पक्ष मगोची अपकीर्ती करत आहेत. त्यांनाही या निकालानंतर उत्तर मिळाले असेल. ‘ढवळीकर बंधूंनी पक्ष नियंत्रणात ठेवला आहे’, असे आरोप करणार्यांनी आता तरी ‘मगोच्या सदस्यांचा ढवळीकरांवर विश्वास आहे’, हे मान्य करावे.’’ केंद्रीय समितीच्या उपाध्यक्षपदी कृष्णनाथ दिवकर, कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रताप फडते, सचिवपदी रत्नकांत म्हर्दोळकर आणि खजिनदारपदी अनंत नाईक यांची निवड झाली. ६५ वर्षांवरील सदस्यांनी यापुढे केंद्रीय समितीवर कार्यरत राहू नये, असे सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले.