दिव्यांगांनाही (विकलांगांनाही) आनंद देण्यासाठी ‘हेल्पडेस्क’

पणजी – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आनंद दिव्यांग (विकलांग) व्यक्तींनाही घेता यावा यासाठी ‘आंचिम’मध्ये दिव्यांगांसाठी खास ‘हेल्पडेस्क’ कार्यरत असेल, तसेच यंदा ‘एक्सेसिबल इंडिया-एक्सेसिबल चित्रपट’ या विभागात ३ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार ‘आंचिम २०२१’ दिव्यांगांसाठी अनुकूल व्हावा, या संदर्भात चर्चा करण्यासाठी ‘गोवा दिव्यांग हक्क संघटने’च्या (‘डॅ्रग’च्या) पदाधिकार्‍यांनी नुकतीच गोवा मनोरंजन संस्थेच्या सरव्यवस्थापक मृणाल वाळके यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चर्चा केली. ‘आंचिम’चा आनंद सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांगांनाही घेता यावा, यासाठी खास व्यवस्था केली जाणार आहे, असे आश्वासन मृणाल वाळके यांनी दिल्याची माहिती ‘ड्रॅग’चे अध्यक्ष एवेलिनो डिसा यांनी दिली आहे.

अपंग किंवा विकलांग यांना ‘दिव्यांग’ म्हणणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य !

‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्वत्र अपंग, विकलांग यांना ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग सध्या प्रचलित करण्यात आला आहे.  अध्यात्माच्या दृष्टीने दिव्यांगाचा अर्थ पाहिल्यास ‘दिव्य + अंग = दिव्यांग’ होय. दिव्य म्हणजे दैवी किंवा सूक्ष्म (म्हणजे लौकिकदृष्ट्या डोळ्यांना न दिसणारे) होय. यावरून दिव्यांग या शब्दाचा अर्थ ‘दैवी किंवा डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म अंग’ असाही होतो. त्यामुळे अपंग किंवा विकलांग या शब्दांसाठी दिव्यांग शब्द वापरणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य ठरते.’