चार हुतात्मा पुतळ्यांची दुरवस्था झाल्याप्रकरणी संभाजी आरमारचा महापालिकेत ठिय्या

सोलापूर – १२ जानेवारी या दिवशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी येथील चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी गेले असता चारही पुतळ्यांची दुरवस्था पाहून ते आक्रमक झाले. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी तातडीने सोलापूर महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी तात्काळ सुशोभीकरण करण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष तात्यासाहेब वाघमोडे यांनी सांगितले. (हुतात्म्यांच्या पुतळ्यांच्या दुरवस्थेकडे महापालिकेचे लक्ष नाही, असा याचा होतो. संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक) चार हुतात्मा बलीदानदिनी सोलापूर शहरातील अनेक जण श्रीकिसन सारडा, कुर्बान हुसेन, मल्लपा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे या हुतात्म्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतात.

या चार हुतात्म्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या प्राणाची आहुती दिली आहे. इंग्रजांनी त्यांना १२ जानेवारी १९३१ या दिवशी येरवडा (पुणे) येथील कारागृहात फासावर चढवले होते. अनेक राजकीय संघटना आणि राजकीय पक्ष या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांसमोर विविध आंदोलने करतात; मात्र पुतळ्यांचे सुशोभीकरण करत नाहीत. महापालिका प्रशासनही याकडे लक्ष देत नाही.