पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळी झालेल्या आरोपामुळे खळबळ !
पुणे – नवीन महाविद्यालय चालू करतांना त्याच्या मान्यतेसाठी शासनाच्या अधिकार्यांनी ५० सहस्र रुपये मागितल्याचा आरोप केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अधिसभेत समारोपाच्या वेळी खळबळ उडाली. अधिसभा सदस्य अमित पाटील यांनी हा आरोप केला. याची नोंद घेत कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. तसेच घडलेल्या प्रकाराची लेखी तक्रार करण्यासही सांगितले. (असे असेल तर संबंधितांची चौकशी करून विनाविलंब कारवाई करणे अपेक्षित आहे. – संपादक)
अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतांना विद्यापिठाने निविदा प्रक्रियेतील नियमांना बगल दिल्याचेही पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. ‘प्राचार्यांसमवेत असणार्या वैचारिक मतभेदांमुळे साहाय्यक प्राध्यापकांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव ‘कॅस’ला पाठवतांना अडवणूक केली जात आहे’, असे शशिकांत तिकोटे यांनी या वेळी सांगितले.