पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गोवा राज्यातील शासकीय, तसेच खासगी रुग्णालयांतील १९ सहस्र आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली. गोव्यातील एकूण ८ रुग्णालयांतील आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येईल. यांपैकी ५ रुग्णालये शासकीय असून ३ रुग्णालये खासगी आहेत. प्रारंभी प्रत्येक रुग्णालयाला १०० डोस दिले जातील.
गोव्यात दिवसभरात ३५ कोरोनाबाधित, तर २ मृत्यू
पणजी – गोव्यात गेल्या २४ घंट्यात नवीन ३५ रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या राज्यात ७९९ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आतापर्यंतची एकूण मृतांची संख्या ७४९ झाली आहे.