राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यासह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठी कारवाई

पुणे – जिल्ह्यामध्ये ७४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी १५ जानेवारीला मतदान आणि १८ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विविध ठिकाणी कारवाई करून अवैध मद्यविक्री केल्याप्रकरणी २७८ गुन्हे नोंद केले आहेत. त्यामध्ये १६७ जणांना अटक झाली आहे. तसेच ११ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये १ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले. (यावरून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काय प्रकार होत असतील, याची कल्पना येते. असे प्रकार करून निवडणून येणारे गावाचा कारभार कधी चांगला करू शकतील का ? – संपादक)

या निवडणुकांमुळे ३ दिवस ड्राय डे असणार आहे, मद्यविक्रीची दुकाने आणि बिअर बार बंद ठेवण्यात येणार आहेत. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरातील हॉटेल आणि ढाबे यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. दिलेल्या वेळेनंतर हॉटेल चालू ठेवल्यास कारवाई केली जाणार आहे, असे झगडे यांनी सांगितले.