सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – काही राजकीय पक्षांनी गाड्या दिल्या; मात्र शेतकर्यांना गायी-म्हशी दिल्या असत्या, तर सर्वसामान्य शेतकरी सक्षम झाला असता. आम्ही नाहक रोजगार आणि विकास यांचे आमिष दाखवून कुणाला फसवले नाही. शेती उत्पन्नासाठी अनुदान आणि कर्ज देऊन शेतकर्यांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन १० जानेवारी या दिवशी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी माडखोल येथे केले.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून चालू करण्यात आलेल्या दुग्ध विकास प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केसरकर बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, साहाय्यक निबंधक कृष्णाकांत धुळप, उद्योजक प्रशांत कामत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शहराकडे जाणार्यांना गावातच रोजगाराची साधने निर्माण झाली पाहिजेत ! – सतीश सावंत
श्री. सतीश सावंत म्हणाले, ‘‘शहराकडे जाणार्या लोकांना गावातच रोजगाराची साधने निर्माण झाली पाहिजेत, यासाठी जिल्हा बँकेचे प्रयत्न आहेत. या ठिकाणी चालू केलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गायी-गुरांचा व्यवसाय करणार्या शेतकर्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा लाभ येथील नव्या उद्योजकांनी घ्यावा.’’