कारागृह अधीक्षक आणि आय.आर्.बी. सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख यांना उत्तरदायी ठरवून त्यांचे त्यागपत्र घेणे आवश्यक ! – अधिवक्ता विनायक पोरोब

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या ढिसाळ सुरक्षाव्यवस्थेचे प्रकरण

सर्व यंत्रणा हाताशी असतांना शासकीय विभागांमध्ये एवढा ढिसाळपणा दिसून येतो, हे लज्जास्पद !

पणजी – कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे, याविषयी म्हापसा येथील अधिवक्ता विनायक डी. पोरोब यांनी एका लेखाद्वारे प्रसिद्ध केले आहे. या लेखात त्यांनी म्हटले आहे,

१. कोलवाळ येथील कारागृहाचे बांधकाम सर्व पायाभूत सुविधांची आवश्यकता पूर्ण करून आणि सर्व सावधगिरी बाळगून करण्यात आले आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या पूर्व अनुमतीखेरीज साधी माशीही तिथे प्रवेश करू शकत नाही. अशी वस्तूस्थिती असतांना कारागृहातून बंदिवान पळाल्याच्या बातम्या सतत कानावर येतात, हे आश्‍चर्यकारक आणि हास्यास्पद आहे.

२. कारागृह सुरक्षेचे योग्य मानक ठेवण्यात आय.आर्.बी. आणि कारागृह प्रशासन यांच्याकडून हलगर्जीपणा होत आहे. बरेच बंदिवान कारागृहात असतांना भ्रमणभाष, दारू, अमली पदार्थ आदी प्रतिबंधित वस्तू सहजपणे मिळवतात, हे भयावह आणि भीषण आहे. मध्यवर्ती कारागृह दोषी व्यक्तींना सुधारण्यासाठीचे सुधारगृह आहे; परंतु कोलवाळ येथील कारागृहात असलेल्या बंदिवानांकडून मनुष्याचे सर्व दुर्गुण अंगीकारले जात आहेत.

३. कारागृहात प्रवेश करतांना प्रवेशद्वाराजवळ कडक तपासणीतून जावे लागते. कारागृहाची बाह्यसुरक्षा आय.आर्.बी.कडे, तर अंतर्गत सुरक्षा कारागृह प्रशासनाकडे असते. तथापि प्रतिबंधित वस्तू कारागृहात कशा येतात, याविषयी अटकळ बांधणे अशक्य आहे.  ‘सी.सी.टी.व्ही., कॅमेरे, भ्रमणभाष जॅमर्स वगैरे यंत्रणांची कमतरता असल्याने प्रतिबंधित वस्तू कारागृहात आणल्या जातात’, हे कारण समर्थन करण्यायोग्य नाही.

४. कारागृह कर्मचारी आणि कारागृह प्रशासनाची सुरक्षायंत्रणा यामध्ये कार्यक्षमतेचा अन् प्रामाणिकपणाचा अभाव असून याच एकमेव कारणास्तव प्रतिबंधित वस्तू कारागृहात आणल्या जातात. यासाठी आय.आर्.बी. किंवा कारागृह प्रशासन यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही दोषी धरता येणार नाही. विशेष करून कारागृह कर्मचारी आय.आर्.बी. कर्मचार्‍यांशी मैत्री करतात आणि अशा मैत्रीपोटी, तसेच कारागृह कर्मचारी प्रतिबंधित वस्तू आत घेऊन जाणार नाहीत, या विश्‍वासापोटी आय.आर्.बी. सुरक्षा कर्मचारी कदाचित् त्यांची तपासणी करत नाहीत. कारागृहात प्रतिबंधित वस्तू सापडण्याचे हे एक कारण असू शकते.

५. कारागृहात प्रवेश मिळवणे, ही गोष्ट कठीण आणि दुरापास्त असते. जर एखाद्या अधिवक्त्याला त्याच्या अशिलाची भेट घ्यायची असेल, तर सुरक्षेच्या नावाखाली पुष्कळ आटापिटा करावा लागतो. आय.आर्.बी कर्मचारी आणि कारागृह प्रशासन एक विशिष्ट सुरक्षायंत्रणा राबवत असल्याचे भासवतात; परंतु प्रत्यक्षात वेगळीच सुरक्षायंत्रणा राबवली जाते.

६. कारागृहात एवढी कडक सुरक्षायंत्रणा असतांना बंदिवान सुटतोच कसा, हे आकलनाच्या पलीकडचे आहे. सरकार आय.आर्.बी. कर्मचारी आणि कारागृह प्रशासन कर्मचारी यांच्या वेतनावर कोट्यवधी रुपये खर्च करत असतांना बलात्काराचा आरोप असलेले आरोपी कोठडीतून पळून गेल्याच्या घटना अलीकडे घडलेल्या आहेत, ही सुरक्षायंत्रणांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

७. अकार्यक्षम कारागृह अधीक्षक आणि कर्मचारी यांमुळे गुन्हेगार अन् बंदिवान यांच्यासाठी कोलवाळ कारागृह स्वर्गासारखे ठरत आहे. त्यांना कारागृहात असतांना सर्व भोग विलास भोगता येतात आणि कंटाळा आला, तर त्यांच्या इच्छेने न्यायालयाचा आदेश नसतांना बिनबोभाटपणे कारागृहाबाहेर जाता येते. यासाठी कोलवाळ कारागृह अधीक्षक आणि आय.आर्.बी. सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख यांना उत्तरदायी ठरवून त्यांचे त्यागपत्र घेणे आवश्यक आहे. कोलवाळ मध्यवर्ती कारागृह हा स्वर्ग मानून गोव्यातील युवकांनी गुन्हेगारीकडे वळून त्यांना तेथे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळू नये, अशी मी आशा बाळगतो.