|
नागपूर – जिल्ह्यातील पेठ ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणूक लढवणारे उमेदवार रामभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे अपहरण करून त्यांना अर्ज मागे घेण्यास बळजबरी केल्याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी ४ जणांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
रामभाऊ पवार यांनी पेठ गट ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत नागपूर ग्रामीण तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर केला होता. निवडणुकीसाठी पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र आरोपी बाल्या बावणे, दीपक करवा, पुरुषोत्तम सोनवणे आणि मनोहर येलेकर यांनी त्यांचे अपहरण करून त्यांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाली आहे. अर्ज मागे घेतल्यानंतर या आरोपींनी रामभाऊ यांची सुटका केली. त्यानंतर रामभाऊ यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी वरील ४ आरोपींवर गुन्हा नोंद केला. या आरोपींची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.