पणजी, ३ जानेवारी (वार्ता.) – स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘प्रकल्पाला विरोध करणार्यांच्या मागण्यांना अनुसरून चर्चा करण्यास शासन सिद्ध आहे. मी शेळ-मेळावली गावाला भेट देऊन संपूर्ण परिसर पाहिला आहे. या भेटीच्या वेळी ग्रामस्थांना ‘मी त्यांच्या प्रत्येक मागणीवर चर्चा करण्यास सरकार सिद्ध आहे’, असे सांगितले आहे. या प्रकरणी ‘स्थानिकांवर अन्याय केला जाणार नाही’, याची मी ग्वाही देतो. प्रस्तावित ‘आयआयटी’ प्रकल्पाच्या ठिकाणी पोलीस चौकी उभारत आहे. पोलीस चौकीची उभारणी ही स्थानिकांना भीती घालण्यासाठी नव्हे, तर ‘आयआयटी’च्या व्यवस्थापनाच्या मागणीवरून चौकी उभारली जात आहे.’’