तपोभूमी, कुंडई येथे दत्तजयंती सोहळा उत्साहात !
कुंडई – भगवान श्रीदत्त या भूतलावर अवतरित झाले, तो दिवस आपण ‘दत्तजयंती’ उत्सव म्हणून साजरा करतो. भगवान श्रीदत्त हे परब्रह्म आहेत. साधकांसाठी निर्विकार ईश्वरीतत्त्व समजणे थोडसे कठीण आहे. ईश्वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभवता यावा, यासाठी या सगुण साकार रूपात देव अवतरित झाले, असे श्रीदत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शनपर आशीर्वचन केले.
श्रीदत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपिठावर दत्तजयंती महोत्सवानिमित्त श्रीदत्त भिक्षा तथा राजोपचार महापूजा उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी पूज्य स्वामीजी संबोधित करत होते.
पूज्य स्वामीजी पुढे म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे दत्तप्रभूंकडे सात्त्विक गाय आहे, त्या गाईप्रमाणे आपण सात्त्विक बनले पाहिजे. गाय हे आपले दैवत आहे. गोव्याला गाईचे नाव प्राप्त आहे. आपल्या धर्माप्रमाणे गोमाता आवश्यक आहे. गाईचे रक्षण अर्थार्जनासाठी, स्वार्थासाठी नव्हे, तर गोपालन ही वेदाज्ञा आहे, हा एकमेव बिंदू लक्षात ठेवून करावे. गाईकडून सात्त्विकता घ्यावी. आपल्या धर्माविरुद्ध, देशाविरुद्ध जर कुणी काही करत असेल, तर गप्प न रहाता जागृत रहावे. सात्त्विकता आणि वात्सल्यता यांचा संदेश देण्यासाठीच श्रीदत्त अवतार आहे.’’
सकाळच्या सत्रात वैदिक गुरुकुल ब्रह्मवृंदांंच्या पौरोहित्याखाली सौ. आणि श्री. नारायण नाईक यांच्या यजमानपदाखाली श्रीदत्त महायाग तथा श्रीदत्त भिक्षा समर्पण विधी संपन्न झाला. राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी समाधी मंदिरात महापूजा, सद्गुरूंच्या समाधी स्थानी महाभिषेक, श्रीदत्त मंदिरात रुद्राभिषेक आणि महापूजा संपन्न झाली. तद्नंतर पूज्य स्वामीजींच्या पावन सान्निध्यात दत्तभिक्षा समर्पण विधी, पूर्णाहुती, श्रीदत्त महाआरती, दर्शन आणि महाप्रसादाने सकाळच्या सत्राची सांगता झाली.
सायंकाळच्या सत्रात श्रीदत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीदत्तनामाच्या गजरात मिरवणुकीद्वारे पालखी उत्सव उत्साहात साजरा झाला. महाआरती, दर्शन आणि महाप्रसादाने दत्तजयंती महोत्सवाची सांगता झाली.
समस्त हिंदु धर्मियांनी घरोघरी महापूजा, गुरुचरित्र पारायण, जपानुष्ठान आणि ‘ऑनलाईन’ माध्यमातून श्रीदत्तप्रभूंच्या दर्शनाने जयंती सोहळा साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदमूर्ती दीपक उपाध्याय यांनी केले.