ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराचा भारतात ६ जणांना संसर्ग

नवी देहली – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर संपूर्ण जगात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या प्रकाराच्या कोरोनाचे संक्रमण झालेले ६ रुग्ण भारतात आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनाचा हा नवा प्रकार १६ देशांत पोचला होता आणि तो भारतातही पोचला आहे.

या नव्या प्रकारच्या विषाणूला रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमाने थांबवली आहेत; मात्र तरीही नव्या कोरोनाने भारतात प्रवेश केला आहे. २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत ब्रिटनमधून ३३ सहस्र नागरिक भारतात परतले. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यात आला आणि चाचण्या करण्यात आल्या. यात ११४ प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले. त्यांचा अहवाल विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आल्यावर बेंगळुरू येथील प्रयोगशाळेत यांतील ३ रुग्णांमध्ये नवीन स्ट्रेन (नवीन प्रकार) आढळून आला, तर भाग्यनगरच्या प्रयोगशाळेतील दोघांच्या शरिरात आणि पुण्यातील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी एका नमुन्यात हा स्ट्रेन आढळला आहे.