श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथील श्री दत्तजयंती उत्सव !

श्री क्षेत्र दत्तवाडी, केपे येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री दत्तमंदिर वसलेले आहे. दत्तजयंतीच्या निमित्ताने या मंदिराच्या संबंधी माहिती आपण जाणून घेऊया.

संकलक : श्री. कृष्णा शेटकर, केपे, गोवा.

मंदिराचा इतिहास

केपे येथील श्री विठ्ठल सोनू नाईक, श्री. रामचंद्र शेटकर, श्री. रखमाजी अंजीखान, श्री. वामन खेडेकर आणि श्री. प्रभाकर भिसे हे पाचही जण माघ कृष्ण पक्ष प्रतिपदेच्या उत्सवासाठी गाणगापूरला जात असत. वर्ष १९६१ मध्ये पोर्तुगिजांनी लावलेल्या आगीमुळे त्यांना गाणगापूरला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे कट्टा-आमोणा येथे गाणगापूर येथील उपक्रमाप्रमाणेे माघ कृष्ण पक्ष प्रतिपदेपर्यंत गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन करण्यास प्रारंभ झाला. कालांतराने ग्रामस्थ आणि तत्कालीन मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या साहाय्याने या मंदिराचा शिलान्यास आणि प्रतिष्ठापना झाली.

स्थानमहात्म्य

कट्टा-आमोणा येथे प्रत्येक वर्षी अवसर येत असे. श्री दत्तमंदिर उभारण्याच्या आधी हा अवसर या ठिकाणी प्रत्येक वर्षी येऊन नारळ ठेवून नमस्कार करत असे. वर्ष १९७२ मध्ये दत्तमंदिर उभारल्यावर मात्र या अवसराने कधीही या ठिकाणी येऊन नारळ ठेवला नाही. या एकाच घटनेवरून या स्थानाचे महत्त्व अधोरेखित होते.

उत्सव

या ठिकाणी मुख्य उत्सव म्हणजे गुरुचरित्र सप्ताह आणि श्री दत्तजयंती. माघ कृष्ण पक्ष प्रतिपदेपर्यंत चालणारा गुरुचरित्र सप्ताह हे येथील एक वैशिष्ट्य आहे. या दिवशी मंदिरातील गुरुचरित्राखाली ठेवलेल्या तांदळावर अजूनही दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या पादुका स्पष्टपणे उमटत आहेत, हे विशेष. या पादुका(पावले) बघण्यासाठी भक्तांची गर्दी होते.

या मंदिराच्या स्थापनेपासून ऐनवेळी अन्नसंतर्पणासाठी आणि उत्सवांसाठी काही कमतरता भासल्यास एखादा भक्त हे सामान नेमकेपणाने आणून देतो आणि श्री दत्त महाराजांनीच स्वप्नदृष्टांतात आज्ञा दिल्याचे सांगतो.

कार्यक्रम

यंदा २८ डिसेंबरला २४ घंट्यांच्या अखंड नामस्मरण सप्ताहास प्रारंभ झाला असून २९ डिसेंबरला सकाळी ११ वाजता त्याची सांगता होईल. दुपारी ३ वाजता श्री दत्तजन्मावर कीर्तन आणि सायंकाळी ठीक ५ वाजता श्री दत्तजन्म सोहळा, त्यानंतर रात्री ८.३० वाजता श्रींची आरती, रात्री ९ वाजता श्रींची शिबिकेतून मिरवणूक आणि प्रसाद होईल. या कार्यक्रमास उपस्थित राहून भक्तगणांनी दत्तकृपेचा लाभ घ्यावा, ही विनंती !

यावर्षी दत्तजयंतीचा उत्सव कै. शशिकांत महादेव नाईक, कुंकळ्ळी यांच्या कुटुंबियांकडून साजरा केला जाणार आहे.

सर्वांची आध्यात्मिक उन्नती होवो, अशी श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना !