केरी, फोंडा येथील श्री विजयादुर्गादेवीचा जत्रोत्सव मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदा ते पौणिर्र्मेपर्यंत साजरा होतो. दशमी हा जत्रेचा मुख्य दिवस असतो. यंदा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी, २४ डिसेंबर २०२० या दिवशी श्री विजयादुर्गादेवीचा वार्षिक जत्रोत्सव आहे.
दुष्ट दुर्जनांचा नाश करून या दिवसांत देवी विश्रांती घेते, असे भक्तजन मानतात. या विश्रांतीच्या काळात मखरोत्सव, नौकारोहण, लालखी, अंबारी आणि पालखी यांतून मिरवणूक इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून देवीची सेवा केली जाते.
मंदिराचा इतिहास
फोंडा तालुक्यातील निसर्गसंपन्न गाव केरी ! अनेक देवतांच्या मंदिरांनी वसलेले हे गाव फळफळावळीच्या बागांनी बहरलेले असते. काकण-केरी अशी या गावाची जुनी ओळख. बांगड्या (कंकण) सिद्ध करण्याच्या भट्ट्या येथे होत्या; पण काळाच्या ओघात त्यांचे अस्तित्व संपले. सातोडे वाड्यावरील श्री सातेरीदेवी या गावची ग्रामदेवता ! श्री वेताळ, श्री लक्ष्मी नारायणदेव, श्री दत्त यांची मंदिरे आणि श्री अंबा विजयादुर्गादेवीचे प्रशस्त देवालय केरी गावात आहे.
गोमंतकात अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यात श्री मंगेश, श्री महालसा, श्री शांतादुर्गा अशा प्रमुख देवालयांचा उल्लेख करावाच लागेल. केरी येथील श्री विजयादुर्गा देवस्थानसुद्धा याच सूचीत बसणारे आहे. शहराच्या जरा आत वसलेले, स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अतिशय आकर्षक, सुभोभित आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे मंदिर आहे.
वर्ष १५१० मध्ये धर्मांध वृत्तीचे पोर्तुगीज या भूमीवर आले. तिसवाडी आणि बार्देश हे प्रदेश कह्यात घेतल्यानंतर पोर्तुगिजांची साष्टी प्रदेशावर दृष्टी पडली. साष्टी तालुक्यातील शंखावळी म्हणजे आजच्या सांकवाळ गावात श्री विजयादुर्गादेवीचे भव्य मंदिर होते. या देवालयाचा विध्वंस होण्याआधी तेथील मूर्ती मात्र भक्तजनांनी सुरक्षित ठिकाणी हालवली. त्या काळच्या सुरक्षित प्रदेशात म्हणजेच अंत्रुज महालात (फोंडा) सांकवाळ गावातून ३ देवालये स्थलांतरित झाली. त्यात श्री विजयादुर्गा, केरी-फोंडा; श्री शांतादुर्गा, गोठण-वेलिंग आणि श्री लक्ष्मी-नृसिंह देवस्थान, वेलिंग यांचा समावेश होता.
श्री विजयादुर्गादेवीच्या मूर्तीच्या स्थलांतराची आख्यायिका पुढीलप्रमाणे आहे. ही मूर्ती आगापूर (अगस्तीपूर) येथील महादेवदेवाच्या तळीत असल्याचा दृष्टांंत एका भाविकाला झाला. त्यानुसार ती मूर्ती त्याला सापडली आणि त्याने तिची स्थापना अतिशय रम्य अशा केरी गावात केली. ही घटना वर्ष १५६० मधील आहे.
याच वर्षी त्या वेळच्या महाराजांनी आणि भक्तजनांनी केरीतील आमरखाणे वाड्यावर श्री विजयादुर्गा मंदिराची उभारणी केली. गर्भागृह, चौक आणि सोंडयो, अशी या देवळाची रचना अत्यंत देखणी आहे. या देवळाच्या प्रशस्त सभामंडपाची उभारणी वर्ष १७९७ मध्ये कै. पांडुरंग रामचंद्र वैद्य अन् इतर महाजन यांनी केली. सभामंडपाला लागून असलेला नगारखाना वर्ष १८९७ मध्ये कै. माधवराव धोपेश्वरकर यांनी बांधून श्रीचरणी अर्पण केला. सध्या देवस्थानच्या प्राकारात असलेली जुनी अग्रशाळा मोडून त्या ठिकाणी देवस्थान समितीच्या अथक परिश्रमानंतर श्री विजयादुर्गा सभागृहाची उभारणी केली. महाजन आणि भक्त यांची रहाण्याची सोय व्हावी, म्हणून सुसज्ज निवासी संकुल उभारण्यात आले. देवस्थानच्या जीर्णोद्धाराची कामे होत असतांना कोणतीही कृत्रिमता दिसणार नाही, याची नोंद वास्तूरचनाकाराने आणि कार्यकारी समितीने घेतली आहे.
देवालयाच्या खालच्या बाजूला एक प्रशस्त तलाव आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी येथे होणारा नौकाविहार म्हणजेच ‘सांगोड’ उत्सव अगदी पहाण्यासारखा असतो. या तलावाची रचना, पाणी अडवण्याची आणि सोडण्याची व्यवस्था शास्त्रोक्त पद्धतीची आहे. हे सगळे अनुभवण्याची संधी सोडू नका.
– श्री विजयादुर्गा देवस्थान समिती, केरी.
जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य
या जत्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे वळवईच्या श्री गजान्तलक्ष्मी देवस्थानाशी संबंधित भाविक श्री विजयादुर्गेच्या जत्रेत मानाने सहभागी होतात. परंपरेनुसार त्या भाविकांना जत्रेला येण्याचे निमंत्रण दिले जाते. श्री गजान्तलक्ष्मीचे भाविक श्री विजयादुर्गेच्या जत्रेला केरीत रात्री येतात. ते आल्यावर आधी प्रसादाचे जेवण त्यांना दिले जाते. त्यानंतर ते पालखी उचलतात. सांगोड फिरवण्याचा मान त्यांचाच असतो. सांगोडातून फेरफटका झाल्यानंतर देवीला मंदिराच्या प्रांगणात आणले जाते आणि मग काला चालू होतो. त्यानंतर देवीची आरती चालू होते. आरतीनंतर परतण्याआधी परंपरेनुसार श्री गजान्तलक्ष्मीच्या भक्तगणांना खाजे, काही पैसे, तसेच दारूसामान भेट देण्यात येते. ही भेट आनंदाने स्वीकारून हे भक्तगण आपल्या गावी परततात. वळवईतील पुढील शिमग्याच्या वेळी मांडावर हे दारूसामान पेटवून शिमग्याला प्रारंभ होतो.
यंदाचे कार्यक्रम
श्री संस्थानचा महापर्वणी जत्रोत्सव आणि त्यानंतरचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
♦ मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी, गुरुवार, २४.१२.२०२० या दिवशी जत्रोत्सव महापर्वणी, सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत श्रींस अभिषेक, महापूजा आणि महाप्रसाद; रात्री ९ वाजता आरती, १०.३० वाजता शिबिकोत्सव आणि १० ते १०.५५ सांगोड असेल. त्यानंतर कृतार्थ, म्हार्दोळ यांच्या वतीने रात्री ११ ते ११.३० दशावतारी काला होईल.
♦ मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी, शुक्रवार, २५.१२.२०२० या दिवशी रात्री ८ वाजता दीपस्तंभास आरती
♦ मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशी, शनिवार, २६.१२.२०२० या दिवशी रात्री ८ वाजता ढवळीकर (बांदिवडे) कुटुंबियांच्या वतीने चांदीची पालखी उत्सव
♦ मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी रविवार, २७.१२.२०२० या दिवशी मणेरीकर (काश्यप गोत्री) कुटुंबियांच्या वतीने होणारा उत्सव आणि पालखी रात्री ८ वाजता
♦ शुक्ल पक्ष चतुर्दशी, सोमवार, २८.१२.२०२० या दिवशी सार्वजनिक गंधपूजा, रात्री ८ वाजता श्री. श्रीधर वामन सांखोळकर, मुंबई यांच्या वतीने श्रींची हत्ती अंबारीतून मिरवणूक होईल.
♦ मार्गशीर्ष पौर्णिमा, बुधवार, ३०.१२.२०२० श्रीसूक्त आवृत्ती; केरी येथील वैद्य कुटुंबियांच्या वतीने आवळी भोजन आणि रात्री ८ वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक होईल.