कर्जफेडण्याची क्षमता असणार्यांकडून थकबाकी वसूल न करणारे आणि थकबाकीदार यांवर त्वरित अन् कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
पुणे – कर्ज परतफेडीची क्षमता असूनही जाणून-बुजून कर्जफेड न करणार्या, कर्जाचे पैसे अन्य उद्देशासाठी वापरणार्या आणि १ कोटींहून अधिक कर्जाची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची यादी प्रत्येक बँकांनी रिझर्व्ह बँकेला आणि क्रेडिट रेटिंग आस्थापनांना कळवणे बंधनकारक आहे. या नियमाचा आधार घेऊन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष श्री. विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकारात अशा थकबाकीदारांची यादी आणि प्रत्येकाचे थकीत कर्ज याचा तपशील मागवला होता. त्यावरून राष्ट्रीयीकृत बँकांच्या २६४ बड्या थकबाकीदारांनी अनुमाने १ लाख कोटी रुपये थकवल्याचे निदर्शनास आले आहे.
रिझर्व्ह बँक थकबाकीदारांची माहिती संकेतस्थळावर का प्रसिद्ध करत नाही ? असा प्रश्न श्री. वेलणकर यांनी उपस्थित केला, तसेच संबंधित बँका आणि सरकारने थकबाकी वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.