नामजप आणि मंत्रोपचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘आपल्याला गायत्रीमंत्र माहिती आहे. आपल्यापैकी बरेच जण या प्रचलित मंत्राचा जपही करत असतात. या मंत्राचे रचेता ऋषि विश्वामित्र असून देवता सवितृ (सूर्य) आहे. गायत्रीमंत्राचे पठण केल्याने व्यक्तीवर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
गायत्री मंत्र : ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात् ।’
अर्थ : दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवाच्या त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. ते (तेज) आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांनी १०८ वेळा गायत्रीमंत्राचे पठण केले. त्यांनी गायत्रीमंत्राचे पठण करण्यापूर्वी आणि पठण केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. गायत्री मंत्रपठणाचा साधकांवर झालेला परिणाम पुढे दिला आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्याgoo.gl/tBjGXaया लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – गायत्री मंत्रपठणाचा चाचणीतील दोन्ही साधकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे : तीव्र आध्यात्मिक त्रास असलेला साधक आणि आध्यात्मिक त्रास नसलेला साधक यांच्यामध्ये मंत्रपठणापूर्वी नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा होती. त्यांनी मंत्रपठण केल्यानंतर त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.
टीप – ‘ऑरा स्कॅनर’ने ४५ अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’ने १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.
२. निष्कर्ष
गायत्री मंत्रपठणाचा साधकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. गायत्रीदेवी : ‘गायत्रीदेवी ही सरस्वती, महालक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देवींचे एकत्रित रूप आहे. ती आदिशक्तीस्वरूप आहे. सवितृपासून (सूर्यापासून)गायत्रीला आणि गायत्रीपासून १२ आदित्य यांना तेज प्रदान केले जाते. स्थुलातून दिसणार्या सूर्यालाही तेज देणारी शक्ती गायत्रीच आहे. तिच्यात सूर्याच्या सोळापट शक्ती आहे.’ (संदर्भ : सनातन संस्थेचे संकेतस्थळ –https://www.sanatan.org/mr/a/9477.html)
३ आ. गायत्रीमंत्र : ‘गायत्रीमंत्र हा सिद्ध मंत्र आहे. गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे विविध देवतांची अप्रगट अवस्थेत असणारी शक्ती आणि चैतन्य प्रगट होऊन कार्यरत होते. गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे वाणी शुद्ध होते. गायत्रीमंत्राच्या उच्चारणामुळे प्राणवहनातील अडथळे दूर होऊन देहातील रक्तवाहिन्या,
७२ सहस्र नाड्या आणि प्रत्येक पेशी यांची शुद्धी होऊन जिवाची अंतर्बाह्य शुद्धी होते.’ (संदर्भ : सनातन संस्थेचे संकेतस्थळ – https://www.sanatan.org/mr/a/9477.html)
३ इ. चाचणीतील दोन्ही साधकांनी गायत्री मंत्रपठण भावपूर्ण केल्याने त्यांना आध्यात्मिक लाभ होणे : चाचणीतील दोन्ही साधकांनी गायत्रीमंत्राचे पठण भावपूर्ण केल्याने त्यांना मंत्रपठणातून पुष्कळ चैतन्य मिळाले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.’
– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१९.११.२०२०)
ई-मेल : [email protected]
गायत्री मंत्राचे पठण करतांना तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकाला आलेल्या अनुभूती
‘१५.११.२०२० या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात ‘गायत्री मंत्राचे पठण केल्याचा तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या साधकावर काय परिणाम होतो ?’, याचा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
१. गायत्री मंत्राचे पठण आरंभ केल्यावर मला डोक्याभोवती संवेदना जाणवू लागल्या.
२. पठण करतांना माझ्या डोक्यात टाळूच्या ठिकाणी चक्राकार काहीतरी फिरत असल्याची जाणीव होऊ लागली.
३. काही वेळाने मला अनावर गुंगी आली.
४. प्रयोग संपल्यावर माझ्या मनात ‘ॐ ॐ नमो भगवते वासयुदेवाय ॐ ॐ ।’ असा नामजप आपोआप होऊ लागला. गेला दीड मास प्रयत्न करूनही मला नामजप करता येत नव्हता. गायत्री मंत्राच्या पठणानंतर नामजप विनासायास होऊ लागला.’
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |