हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून धनदांडग्या दलालांचे आंदोलन ! – नितीन फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष, गोवा सुरक्षा मंच

शेतकर्‍यांच्या नावाखाली पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध

प्रातिनिधिक छायाचित्र

पणजी, ७ डिसेंबर (प्रसिद्धीपत्रक) – शेतकर्‍यांच्या वतीने ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या ‘भारत बंद’ला गोवा सुरक्षा मंचचा विरोध असल्याची स्पष्ट भूमिका मंचचे गोवा प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन फळदेसाई यांनी मांडली.

वास्तविक या आंदोलनातील शेतकर्‍याला शोधावे लागेल, अशी परिस्थिती आहे; कारण या देशभर चालू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीच आहे. हरियाणा आणि पंजाब येथील धनदांडग्या दलालांचे हे आंदोलन आहे. या आंदोलनाचा प्रत्यक्ष शेतकर्‍यांना काहीच लाभ नाही अथवा त्यांचा संबंधही नाही. हे आंदोलन केवळ दलाली बंद होऊ नये, यासाठी आहे आणि म्हणूनच आमचा या आंदोलनाला विरोध आहे, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की, काही विदेशी लोकांचाही यामध्ये समावेश आहे. आमच्या देशातील शेतकर्‍यांचे जर हे आंदोलन असेल, तर त्यात विदेशी मंडळींचा संबंध काय ? हे अनाकलनीय आहे. नरेंद्र मोदी सरकारने जो निर्णय घेतला, त्यात काही त्रूटी असू शकतात; पण त्या समोरासमोर बसून सोडवता येतील. त्यासाठी देशाला वेठीस धरण्याचा केलेला प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. दलाली बंद झालीच पाहिजे; कारण या दलालीमुळेच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जो लाभ शेतकर्‍यांना मिळायला हवा, तो केवळ हे दलाल खात असल्यामुळे शेतकर्‍यांची ही अवस्था झाली आहे.

दलाली बंद झाल्याशिवाय बळीराजाची परिस्थिती पालटणार नाही. त्यामुळे दलाली बंद झालीच पाहिजे. हे शेतकर्‍यांचे आंदोलन नसून केवळ दलालांचे आंदोलन आहे, हे लोकांनी लक्षात घ्यावे.